महावितरण कार्यालयात ‘ राडा ‘ करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकाला धरले

शेअर करा

नगर शहरासह जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांपासून भारनियमन होत असल्याचे दिसून येत आहे. सदर प्रकरणी केडगाव येथील महावितरण कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांना कोतवाली पोलिसांनी शिरूर येथून ताब्यात घेतले आहे. सरकारी संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी कोतकर यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरणकडून कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा खंडित केला जात असल्याने केडगाव येथील भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर यांनी त्याच्या दहा ते बारा साथीदारांसह केडगाव येथील महावितरण कार्यालयात जात ‘ आत्ताच्या आत्ता लाईट सुरु करा. लाईट तुम्ही बंद का केली ? ‘ असे विचारत कार्यालयातील टेबल आणि टेलिफोन यांची तोडफोड केली होती.

महावितरणचे अधिकारी योगेश गोरक्षनाथ आभाळे ( राहणार अंबिकानगर केडगाव ) यांनी सदर प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून कोतवाली पोलिसांनी कोतकरसह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी कोतकर यास कोतवाली पोलिसांनी शनिवारी दुपारी शिरूर येथून ताब्यात घेतले आणि पोलिस ठाण्यात हजर केले.

गेल्या काही महिन्यांपासून नगर शहरातील भाजप नगरसेवक वादात सापडत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीला येत आहेत. सावेडी येथील भाजपचे नगरसेवक मनोज दुल्लम यांच्यावर रंगपंचमीचा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे तर दुसरा नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे तर आता भाजपचेच तिसरे नगरसेवक मनोज कोतकर यांच्यावर महावितरण कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना ताब्यातही घेण्यात आले आहे.


शेअर करा