नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊस तोडीसाठी असलेले उसाचे पीक आधी पेटवून द्या नंतर ऊसतोड देऊ अशा पद्धतीने ऊसतोड कामगारांनी मोठ्या प्रमाणावर कार्यपद्धती अवलंबलेली असल्याने शेतकऱ्यांच्या उसाचे वजन घटून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्यातच अशाच पद्धतीने काम केले जात असून एक प्रकारे शेतकऱ्यांची यातून अडवणूक होत आहे.
15 ते 16 महिन्यांचा ऊस होऊन देखील ऊसतोड मिळत नसल्याने शेतकरी हतबल झालेले आहेत. आधी उसाचे क्षेत्र पेटवून द्या त्यानंतर बोलू असे सांगून उसाच्या मोळ्या बांधण्यासाठी देखील शेतकऱ्यालाच सुतळीचा खर्च करायला लावण्यात येत आहे. ऊस गळीताला पाठवून जे काही पैसे पदरात पडतील ते घेण्याची मानसिकता देखील शेतकऱ्यांची झालेली आहे .
दिवस-रात्र राब राबून एकीकडे भारनियमन आणि दुसरीकडे ऊसतोड कामगारांनी चालवलेली मनमानी पद्धत यामुळे शेतकऱ्यांच्या हातात फारशी रक्कम मिळत नाही. केलेल्या कष्टाची देखील भरपाई मिळत नाही आणि ऊस तोडीसाठी कारखान्यात हेलपाटे मारून ऊस तोड मिळाली तरी प्रत्यक्षात ऊस तोडून नेण्यासाठी मजूर मनमानी पद्धतीने शेतकऱ्यांना वेठीस धरत आहेत.
काही जाणकार शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे मागील चाळीस ते पन्नास वर्षात अशी परिस्थिती कधीच झालेली नव्हती. ऊस तोडीबाबत एकीकडे ग्रामीण पातळीवर चालणारे राजकारण आणि दुसरीकडे हातातोंडाशी पीक आल्यानंतर तोडणीसाठी मजुरांनी चालवलेली मनमानी पद्धत यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे .