‘ होऊन जाऊ द्या ‘ , राज ठाकरे औरंगाबाद इथे नक्की काय काय बोलले ?

शेअर करा

महाराष्ट्रात मला कोठेही दंगली घडवायच्या नाही, तशी माझी इच्छाही नाही; पण मशिदीवरील भोंगे 4 मेपर्यंत उतरायलाच हवे. अन्यथा मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा वाजवू विनंती करूनही समजत नसतील तर होऊन जाऊ द्या! अशी चिथावणीही राज ठाकरे यांनी औरंगाबाद इथे भाषणात दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे ?

लाऊड स्पिकर हा सामाजिक विषय आहे, तो धार्मिक विषय नाही पण तुम्ही याला धार्मिक वळण देत असाल तर आम्हीही त्याचे उत्तर धर्मानेच देऊ. टोकाची भूमिका घ्यायची आमची इच्छा नाही, उत्तर प्रदेशात लाऊड स्पिकर उतरवले जात असतील तर महाराष्ट्रात का नाही ?

आज 1 मे आहे, 3 मे रोजी ईद आहे, मुस्लिम धर्मियांच्या सणामध्ये मला विष कालवायचे नाही म्हणून 3 ऐवजी 4 मे पासून आम्ही ऐकणार नाही. या तारखेनंतर जे लाऊडस्पिकर लागतील त्यांच्यासमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा वाजवायलाच हवा. समजत नसतील तर होऊन जाऊ द्या

सभेच्या वेळी जर हे बांग सुरू करीत असतील तर आत्ताच्या आत्ता त्यांच्या तोंडात बोळा कोंबावा त्यानंतरही समजत नसेल तर मला माहित नाही. सरळ भाषेत समजत नसतील तर एकदा काय ते होऊनच जाऊदे असे म्हणत मनसैनिकांनी अजिबात शांत बसता कामा नये. माझ्या सभेवेळी आवाज नको असे म्हणत राज यांनी रस्त्यावर नमाज पठण करण्याचा अधिकार यांना कुणी दिला. लाऊड स्पिकर लाऊन गोंगाट करणार असेल तर आम्हीही मशिदीसमोर लाऊड स्पिकर लावू.

महाराष्ट्राच्या घराघरात शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराज पोहचवले त्या पुरंदरेंना शरद पवार वृद्धापकाळात त्रास देत होते, ते ब्राम्हण होते म्हणून त्यांना त्रास दिला जात होता. मी दोन समाजात दुही माजवतो असे पवार म्हणतात पण पवार स्वतःच जाती-जातीत विष कालवतात. हातात पुस्तक घेतले की लेखक कोणत्या जातीचा आहे हे शरद पवार बघतात.

रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत असे कुणाही म्हटले नाही पण शरद पवार आणि राष्ट्रवादीने या विषयाचे राजकारण केले. शिवाजी महाराजांवर रामदासांऐवढे कुणीही एवढे दर्जेदार लिहिले नाही. ज्या दिवसापासून मी शरद पवार नास्तिक असल्याचे सांगितले तेव्हापासून पवार त्यांचा फोटो देवासोबत लावत आहेत.

समाजवादाचा विचार याच महाराष्ट्रातून गेला, राष्ट्रवादाचा विचार याच महाराष्ट्रातून गेला आणि हिंदुत्वाचा विचारही याच महाराष्ट्रातून गेला. पवारांनी आपली नौटंकी थांबवावी ते ध्रुवीकरणाचे राजकारण करतात. मी जात मानत नाही हे पवारांनी समजून घ्यावे. तुम्हाला ‘हिंदू’ या शब्दाची अ‍ॅलर्जी आहे. जातीच्या वर उठून आपण मराठी कधी होणार, हिंदू कधी होणार ?

शाहू फुलेंचा महाराष्ट्र असे पवार म्हणतात; पण त्यांच्या तोंडी कधीही शिवाजी महाराजांचे नाव ऐकले नव्हते. त्यांच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांचा फोटोही नव्हता पण मी यावर बोललो तेव्हा शरद पवारांनी शिवाजी महाराजांचे नाव घ्यायला सुरुवात केली. मी शरद पवारांना नास्तिक म्हटले तर त्यांना झोंबले त्यावर शरद पवार मला म्हणतात की, राज यांनी त्यांच्या आजोबाचे पुस्तक वाचावे. मी माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तके वाचली आहेत. मी वाचलेले पुस्तक व्यक्तीसापेक्ष आहे पवारांसारखे जाती-जातीत भांडणे लावणारे नव्हते. आजोबा भटभिक्षुकीच्या विरोधात होते पण ते धर्म माननारे होते.

शिवाजी महाराजांच्या मृ्त्यूनंतर औरंगजेब महाराष्ट्रात 27 वर्षे आला आणि येथेच त्याचा मृत्यू झाला. औरंगजेबाने लिहिलेली पत्र पाहिल्यास त्यात नमुद आहे की मला शिवाजी अजूनही छळतोय अर्थात औरंगजेबाला कळले होते की, शिवाजी व्यक्ती नाही तर एक विचार आहे. औरंगाबादचे मुळ नाव खडकी, एक पैठण आणि दुसरा देवगिरी किल्ला या दोन्ही राजधानीही याच जिल्ह्यातील आहेत पण जो समाज इतिहास विसरला त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला. ज्ञानेश्वर गेल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी येथे आला आणि देवगिरीत शिरला होता.

अलाउद्दीन खिलजी इथे आला तेव्हा त्याच्यासोबत काही हजार लोक होते, पण लाखो सैनिक त्याच्यासोबत येत असल्याची खोटी बातमी महाराष्ट्रात पसरवली गेली. खिलजीच्या काळात बलात्कार झाले, मंदिरे पाडली गेली, मग 1630 मध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. स्वाभिमानाने कसे जगायचे हे आमच्या राजाने (छत्रपतींनी) शिकवले.

आमच्या विचारात शिवाजी यायला हवे, हाच आमचा महाराष्ट्र आहे, पण महापूरूषांचे विचार रुजवण्यासाठी फक्त त्यांच्या जयंत्याच साजऱ्या केल्या जात आहे. आज राजकारणाची अवस्था काय झाली? महाराष्ट्राने देशाला विचार दिला त्याच राज्यातील नेत्यांमुळे आज महाराष्ट्राची अब्रु जात आहे. महाराष्ट्र रोज खड्ड्यात जात आहे आणि आपण महाराष्ट्र दिन साजरा करीत आहोत. या दिवसातून आपण काहीच प्रेरणा घेत नाही. आई -बहिणीवरून शिव्या घातल्या जात आहेत. आपण सर्वांना फक्त हुल्लडबाजी शिकवत आहोत असेही राज म्हणाले.

”माझ्या सभेला परवानगी मिळणार कि नाही मिळणार ही गोष्ट का केली हे मला अजूनही समजली नाही. महाराष्ट्रातील कोणत्याही कोपऱ्यात सभा घेतली असती तरीही तुम्ही पाहिलेच असते. मुंबईला सभा घेतली त्यानंतर सगळेच जण सभा घेतली. त्यानंतर अनेक जण बडबडायला लागले. खरे तर मी दोनच सभा घेतल्या या सभांवर किती बोलले गेले” असे राज ठाकरे म्हणाले.

ठाण्याच्या सभेनंतर औरंगाबादेत सभा घेत आहोत म्हणजे यानंतरच्या सभाही मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात होणार आहेत. कोकण, विदर्भ, प. महाराष्ट्रातही मी सभा घेणार आहे. सभांना आडकाठी आणून काहीच होणार नाही. कोंबडा झाकायचे ठरवले तरीही सुर्य उगवतोच असेही राज ठाकरे म्हणाले. राज्यात अनेक प्रश्न आहे.


शेअर करा