भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि एका चॅनेलवर कटकारस्थानाने हत्या केल्याची फिर्याद : काय आहे बातमी ?

शेअर करा

भाजप सत्तेत आल्यापासून देशातील मीडियाची झालेली वाताहत आपण सर्व पाहत आहोत. सत्ताधारी भाजपच्या विरोधातील लोकांना लाईव्ह कार्यक्रमादरम्यान भाजपच्या संस्कृतीला साजेसे अशा पद्धतीने शिवराळ तसेच मानसिक त्रास होईल अशा पद्धतीने टार्गेट केले जाते . काही ठिकाणी हे शक्य नसल्यास विरोधी बोलणाऱ्यांच्या घरच्या मंडळींवर देखील टीका करायला भाजप प्रवक्ते सोडत नाहीत.

असाच प्रकार बुधवारी एका वृत्तवाहिनीच्या लाईव्ह कार्यक्रमात काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी आणि भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्या दरम्यान झाला होता . कार्यक्रम संपताच बुधवारी सायंकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन झाले. या प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा आणि संबंधित वृत्तवाहिनीविरुद्ध लखनौ येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लखनऊच्या हजरतगंज कोतवालीत तसेच अयोध्येतील कोतवाली ठाण्यात संबित पात्रा तसेच वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक आणि चॅनेलच्या मालकाविरुद्ध उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अंशू अवस्थी यांनी कटकारस्थानाने हत्या केल्याची फिर्याद दाखल केली आहे. संबित पात्रा यांनी या चर्चेत मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी त्यागी यांना ‘ जयचंद’ म्हणून अवहेलना केली आणि कपाळावर टिळा लावल्याने कोणी हिंदू होत नाही, अशी वैयक्तिक टीका केली. खालच्या पातळीत बोलल्यामुळे राजीव त्यागी यांना शो दरम्यानच त्रास होत असल्याचे जाणवत होते मात्र त्यांनी वेळ निभावून नेली मात्र घरी जाताच अस्वस्थ झालेल्या त्यागी यांचा हृदयगती बंद पडून मृत्यू झाल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे.

राजीव त्यागी यांच्या निधनामुळे वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या चर्चांच्या खालावलेल्या स्तरावर प्रश्नचिन्ह लावले जात आहे. वृत्तवाहिन्यांवरील चर्चा अर्थहीन, विषारी आणि जीवघेण्या ठरत आहेत. यावर वृत्तवाहिन्याचे मालक, संपादक आणि अँकर्सनी आत्मचिंतन करण्याची ही घडी असल्याची भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी व्यक्त केली आहे. वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या विषारी चर्चा आणि विषारी प्रवक्ते संयम आणि साधेपणाने चर्चा करणाऱ्यांचे आणखी किती जीव घेणार आणि अशा चर्चांनी किती काळ टीआरपीचा धंदा चालवणार, असा सवाल काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.

दिल्लीच्या सीमेवरील गाझियाबाद येथे राहणारे राजीव त्यागी यांच्या पार्थिवावर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात हिंडन स्मशानघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले असले तरी आगामी काळात देखील अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून चॅनेलवर अशा विखारी चर्चा तसेच इतरांना देशद्रोही धर्मद्रोही अशा पद्धतीने टार्गेट करणे हे प्रकार बंद झाले पाहिजेत . सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने चालणारे पेड न्यूज नेटवर्क आणि विकलेले अँकर यामुळे सध्या तरी असे होणे अवघड दिसत आहे .


शेअर करा