अल्पवयीन विद्यार्थीनीला पोटाचा त्रास सुरु झाल्याने ‘ धक्कादायक ‘ घटना आली उघडकीस : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

अल्पवयीन शाळकरी विद्यार्थीनीला पोटाचा त्रास होऊ लागल्याने तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरने जे सांगितले ते ऐकून मुलीच्या आईवडिलांच्या पायाखालची वाळूच सरकली. पीडित मुलगी गर्भवती निघाल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधील नाशिकरोड परिसरातील देवळाली इथे उघडकीस आला आहे.आईवडिलांनी तिला विश्वासात घेऊन माहिती विचारली असता तिने जे सांगितले ते त्याहून देखील धक्कादायक होते . मंगळवारी १८ तारखेला सदर प्रकार उघड झाला आहे .

मुलीच्या म्हणण्याप्रमाणे, सहा महिन्यापूर्वी सायकलवरुन घरी येत असताना एका अज्ञात इसमाने तिच्या सायकलला धडक देऊन खाली पाडले आणि तिच्यावर अतिप्रसंग केला.रस्त्यावर कोणीही नसल्याचा गैरफायदा त्या तोंडावर रुमाल बांधलेल्या नराधमाने घेतला. शाळकरी मुलीला बाजूला एका पडीक जागेत नेऊन तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. दरम्यान ती बेशुध्द पडली असता नराधम त्याच अवस्थेत तिला सोडून फरार झाला.

त्यानंतर शुद्धीवर आल्यावर पीडित मुलगी घरी आली. घरी जर आई वडिलांना सांगितले तर ते शिक्षण बंद करतील या भितीमुळे विद्यार्थिनीने कोणालाही काही सांगितले नाही. त्यानंतर दोन आठवड्यांचा कालावधी उलटला असता रात्री आठ वाजेच्या सुमारास ती पीडित शाळकरी मुलगी घरी एकटी होती. आई वडिल कामानिमित्त बाहेर गेले होते त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने तिच्या घराचा दरवाजा ठोठावला. आई वडील आल्याच्या आशेने तिने दरवाजा उघडला मात्र पुन्हा तो नराधम घरात घुसला आणि त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला.

आईवडील घरी आल्यानंतर देखील मुलीचे वडील अत्यंत रागीट असल्याने मुलीने हा प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला नाही. दहा दिवसांपूर्वी पीडित मुलगी आई वडिलांसह औरंगाबाद जिल्ह्यात मामाच्या घरी गेली. मुलीचे पाय व पोट खूप दुखत असल्याने तिला दवाखान्यात नेण्यात आले. त्यावेळी तपासणी करताना ती गरोदर असल्याचे उघड झाले आणि मुलीने सर्व घटना पालकांना सांगितली. मुलीच्या आईवडिलांना हे ऐकताच मोठा धक्का बसला आहे .

पीडित मुलीला सध्या औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तिविरुद्ध बलात्कार तसेच पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या नराधमाचा शोध घेत आहेत .


शेअर करा