अखेर ‘ त्या ‘ महिलेच्या पतीला बेड्या , राहत्या घरी घेतला होता गळफास

कौटुंबिक हिंसाचार हा महाराष्ट्राला काही नवीन राहिलेला नाही अशीच एक घटना पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे उघडकीला आली असून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. सदर प्रकरणी तिच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल केल्यावर विवाहित महिलेच्या पतीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, करिष्मा समीर शेख असे मयत महिलेचे नाव असून तिचा पती समीर मोहम्मद शेख हा सातत्याने तिला मारहाण करून त्रास देत होता. त्याच्या व कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून या मुलीने करंजी येथे एक जूनला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास राहत असलेल्या घरी गळफास घेतला होता.

मयत विवाहितेचे वडील बडेमिया जान मोहम्मद पठाण ( राहणार बोधेगाव तालुका शेवगाव ) यांनी याप्रकरणी पतीच्या विरोधात फिर्याद दिली आणि त्यानुसार पाथर्डी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. समीर शेख याला तात्काळ कारवाई करत पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरविंद चव्हाण हे करत असल्याचे समजते.