क्लेरा ब्रूस प्रकरणात विश्वस्त यांचा मनपाच्या ‘ ढिल्ल्या ‘ पद्धतीवर निशाणा , म्हणाले की ..

शेअर करा

नगर शहरातील एसटी स्टँड परिसरानजीक असलेली क्लेरा ब्रूस मिळकत ही धर्मादाय आयुक्त यांच्या परिशिष्टात नोंदलेली असून ही जागा सध्या तहसीलदारांच्या ताब्यात आहे त्यामुळे इथे बेकायदेशीर ताबा करून केलेले बांधकाम हटवावे अशी मागणी अहमदनगर पहिली मंडळी चर्च विश्वस्त असलेले रवींद्र ठोंबरे यांनी केली आहे.

रवींद्र ठोंबरे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले असून क्लेरा ब्रुस ग्रुप भूखंड हा काही माफियांनी दंडेलशाही करून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र युनायटेड चर्च मिनिस्ट्री मुंबई या संस्थेच्या मिळकती अमेरिकन मराठी मिशन यांच्या ताब्यात आहेत. त्यांची धर्मादाय आयुक्तांच्या परिशिष्टात नोंद झालेली असून 2007 आणि 2016 या वर्षी काही भूखंड माफियांकडून ही जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यामुळे 2019 पासून ही जागा प्रशासनाच्या ताब्यात आहे.

जागा प्रशासनाच्या ताब्यात असताना देखील तिथे ताबा करून बेकायदेशीर पद्धतीने बांधकाम करण्याचा हा प्रकार घडलेला असून महापालिकेनेही बांधकाम तात्काळ हटवावे अशी मागणी राजू देठे, संजय पारधे यांनी केलेली आहे.. नगर महापालिका आता या प्रकरणी काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. क्लेरा ब्रूसला नगर जिल्ह्यात शिक्षणाचा मोठा वारसा लाभलेला आहे मात्र असे असताना महापालिकेकडून कारवाईस दिरंगाई केली जात असल्याचा देखील आरोप केला जात आहे.

नगर शहरात अनेक ठिकाणी अवैध बांधकामे उभी राहिलेली आहेत. बेकायदेशीरपणे भूखंड ताब्यात घेऊन कंपाउंड ठोकून ‘ ताबा बसवणे ‘ या पद्धतीने गुन्हेगारी शहरात सुरू असून नियमबाह्य पद्धतीने देखील बांधकाम केल्यानंतर महापालिकेकडून कुठलीही कारवाई केली जात नाही तर सदर प्रकरण दिवाणी असल्याने आम्ही काय करू ? असे सांगत पोलीस प्रशासनामधून मुद्दा टोलवण्यात येतो. महापालिकेत तक्रारदाराचे हेलपाटे मारून झाल्यावर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला जातो आणि महापालिका ‘ न्यायालयात प्रकरण आहे ‘ सांगत हात वर करते असे आतापर्यंत दिसून आले आहे.


शेअर करा