‘ जेईईने दमवल अन सीईटीने रडवलं ‘ , म्हणून विद्यार्थ्यांसोबत पालकही झालेत हवालदिल

शेअर करा

सध्या इंजिनिअरिंग आणि फार्मसी अंडर ग्रॅज्युएट ऍडमिशनसाठी गरजेच्या असलेल्या जेईई आणि एमएचटी-सीईटी परीक्षा सुरु आहेत. जेईई परीक्षा दोन सत्रात पार पडलेली आहे तर सध्याच्या परिस्थितीत एमएचटी-सीईटी परीक्षा सुरू असून राज्य सरकारच्या परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभार सातत्याने समोर येत आहे. जेईई परीक्षेत देण्यात आलेली परीक्षा केंद्रेही विद्यार्थ्यांच्या राहत्या स्थळापासून तब्बल शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरावर देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे याआधीही मोठ्या प्रमाणात हाल झाले होते.

सध्या पावसाळा सुरू असून रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे त्यातच परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी हे अल्पवयीन असून राहत्या स्थळापासून तब्बल शंभर ते दीडशे किलोमीटरवर परीक्षा केंद्रे देण्यात आल्याने या विद्यार्थ्यांना दुचाकीवर पाठवणे धोकादायक झाले आहे तर सकाळी ८ च्या आत त्यांना घेऊन परीक्षा केंद्र गाठणे पालकांसाठी देखील मोठ्या जिकिरीचे झालेले आहे. आधीच पाऊस त्यात खराब झालेले रस्ते यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पालकांना तर मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे.

एमएचटी-सीईटीची परीक्षा महाराष्ट्र सरकारकडून घेतली जाते तर जेईई ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असते त्यामुळे कदाचित जेईईसाठी आपल्याला लांबचे परीक्षा केंद्र आले असेल अशी पालकांची अपेक्षा होती मात्र महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात येत असलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेबद्दल देखील असाच प्रकार दुर्दैवाने घडत आहे. तब्बल शंभर ते दीडशे किलोमीटरपर्यंत असलेले परीक्षा केंद्र सकाळी आठच्या आत गाठणे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पालकांसाठी मोठे अडचणीचे ठरत आहे. ‘ जेईईने दमवल अन सीईटीने रडवलं ‘ अशा सध्या विद्यार्थ्यांसोबत पालकांच्या देखील प्रतिक्रिया आहेत.


शेअर करा