
एक अत्यंत खळबळजनक घटना औरंगाबाद येथे समोर आलेली असून अवघ्या तेरा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या डॉक्टर महिलेने इंजिनिअर असलेल्या पतीच्या त्रासाला वैतागून गेल्या आठवड्यात एक इंजेक्शन घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेला होता. घाटी रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू होते मात्र मंगळवारी सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सदर प्रकरणी महिलेचा पती, सासू सासरा दीर यांच्या विरोधात सातारा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, डॉक्टर वर्षा अंबादास व्यवहारे ( वय 25 ) आणि त्यांचा पती धनंजय वसंत डोंगरे ( राहणार सावरगाव पोखरी तालुका गेवराई जिल्हा बीड सध्या राहणार औरंगाबाद शहर ) यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. घरातून विरोध होत असल्याने या दोघांनी आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता. पती धनंजय हा पैठण येथील एका कंपनीत काम करत होता तर त्यांच्या पत्नी वर्षा एका रुग्णालयात नोकरी करत होत्या. डॉक्टर वर्षा यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रेमविवाहाला अखेर मान्यता दिली होती मात्र सासरा वसंत डोंगरे आणि त्याच्या कुटुंबातील त्याची पत्नी सिंधुबाई आणि दीर बाप्पा यांना मात्र हा विवाह मंजूर नसल्याने त्यांनी वर्षा यांना त्रास देण्यास सुरुवात केली होती.
वर्षा ही आमच्या जातीतील नसल्याने धनंजय याचे आम्हाला दुसरे लग्न करून द्यायचे आहे त्यामुळे तू त्याला सोडून दे, असे सांगत त्यांनी वर्षाला त्रास देण्यास सुरुवात केली. वर्षा या गर्भवती असल्याने देखील सासू-सासरेकडून त्यांना मारहाण करण्यात येत होती. आता गुपचूप तू एक लाख रुपये घे अन धनंजय याचा नाद सोडून दे , अशा स्वरूपाने मानसिक त्रास दिला जात असल्याने तीन ऑगस्ट रोजी पतीसोबत देखील भांडण झाल्याने वर्षा यांनी खोलीचा दरवाजा बंद करून आतमध्ये इंजेक्शन घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
सदर घटना उघडकीला आल्यानंतर त्यांना घाटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 4 ऑगस्ट रोजी पहाटे त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तेव्हापासून शुद्धीवर आल्या नाहीत त्यानंतर उपचार सुरू असताना मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वर्षा यांच्या भावाने या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मयत वर्षा यांनी इंजेक्शन घेण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये पती सासू सासरा दीर यांच्या नावाचा उल्लेख करत वतीने प्रेमाच्या नावाखाली आपल्याला फसवले असेही म्हटलेले आहे. बँकेचा लॉकर नंबर, कुणाला किती पैसे दिले आहेत, एफडी कितीची केलेली आहे यासोबतच बँक अकाउंट पासवर्ड देखील लिहून ठेवत त्यांनी ही रक्कम आपल्या आई-वडिलांना द्यावी असे म्हटले आहे.
सुसाईड नोटमध्ये त्यांनी, ‘ मम्मी पप्पा मला माफ करा. माझं त्याच्यावर प्रेम होतं पण तुमच्यापेक्षा जास्त नव्हतं. मी त्याला लग्नाला नाही म्हणत होते मात्र त्याने मला धमकी देऊन बोलावून घेतलं अन तो मला फसवत गेला आणि मी वाहत गेले. आता सुद्धा माझी मरायची इच्छा नाही पण मी जे काही केले त्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला. आता मला एकटीला समाजाला सामोरे जायला खूप त्रास होत आहे. तुमच्यावर माझी जबाबदारी पडली असती म्हणून मी या त्रासातून मुक्त होत आहे. मी जगले असते तर तुम्हाला जास्त त्रास झाला असता ‘, . असे म्हटले आहे