अखेर श्रीगोंद्यातील ‘ त्या ‘ तरुणाचा मृतदेहच आला हाती

नगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील एक 24 वर्षीय युवक गेल्या सात दिवसांपासून बेपत्ता झालेला होता. नाणेघाटातील दरीमध्ये त्याचा शोध घेण्यासाठी सुमारे 100 जणांचे पथक तळ ठोकून होते . ट्रेकर्स आणि वनविभागाच्या पथकाने अखेर त्याचा ठावठिकाणा शोधून काढलेला असून या तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आलेले आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजता त्याचा मृतदेह सापडलेला असून त्यानंतर कुटुंबीयांवर शोककळा पसरलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मनोज गोरख जठार ( वय 24 ) हा मंगळवारी राहत्या घरातून तो निघून गेलेला होता . पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असलेल्या नाणेघाटा जवळ त्याने एका हॉटेलच्या समोर त्याची दुचाकी लावली आणि त्यानंतर तो तेथील एका कठड्याकडे गेलेला होता. सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे समोर आल्यानंतर तो पुन्हा आल्याचे दिसले नाही त्यामुळे तो त्याच परिसरात कुठेतरी असावा असा शोध घेण्यात येत होता. लोणी व्यंकनाथ येथील अनेक तरुणांनी देखील तिथे धाव घेतली होती मात्र अखेर दुर्दैवाने त्याचा मृतदेहच हाती लागला असल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.