रुईछत्तीशीच्या ‘ मुन्नाभाई ‘ चा बाजार उठला , एका महिलेने गमावले प्राण

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना रुईछत्तीशी परिसरात उघडकीस आली असून बाळंतपणासाठी दाखल केलेल्या एका 19 वर्षीय तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. 31 तारखेला नगर तालुक्यातील रुईछत्तीशी इथे ही घटना उघडकीला आलेली असून ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तो डॉक्टर चक्क बोगस असल्याचे आढळून आले आहे. त्याला बेड्या ठोकण्यात आलेल्या असून नगर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ज्ञानेश्वर निवृत्ती पवार ( वय 63 राहणार साकत तालुका नगर ) असे आरोपी बोगस डॉक्टरचे नाव असून रुईछत्तीशी येथे तो डॉक्टर डी. बी. बोस या नावाने बनावट दवाखाना चालवत होता. एका पत्र्याच्या शेडमध्ये जनावरांच्या गोठ्यात त्याचा हा दवाखाना थाटलेला होता आणि परिसरातील तसेच जिल्ह्याबाहेरील अनेक नागरिक तिथे येऊन त्याच्याकडून उपचार करून घेत होते. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याचा हा कारभार बिनबोभाट सुरू असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे. आरोग्य विभागाकडून आत्तापर्यंत त्याच्यावर का कारवाई करण्यात आली नाही ? त्याच्या पाठीमागे कोणाचे आशीर्वाद आहेत ? या चर्चेला आता ऊत आलेला आहे.

तक्रारदार व्यक्ती असलेले शंकर फुलमाळी यांनी त्यांच्या मुलीला गावातील या दवाखान्यात बाळंतपणासाठी ऍडमिट केलेले होते मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. नगर तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले त्यावेळी या डॉक्टरकडे कुठली डिग्री आहे आणि तो कुठली औषधे वापरतो याची माहिती घेतली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्यानंतर त्याच्याकडे कुठलीही पदवी नसल्याचा देखील प्रकार समोर आला. विशेष म्हणजे तो देत असलेली औषधे ही देखील कोडवर्ड देऊन त्याच परिसरात एका ठराविक दुकानातच मिळतात अशी ही माहिती समोर आलेली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार ज्ञानेश्वर निवृत्ती पवार यांचा हा बोगस दवाखाना तब्बल वीस वर्षांपासून या परिसरात सुरू होता. आरोग्य यंत्रणा इतके दिवस झोपा काढत होती का ? असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला असून याआधी देखील या बोगस डॉक्टरमुळे अशा घटना घडल्या असल्याची शक्यता आहे मात्र नागरिकांकडून तक्रार केली गेली नाही त्यामुळे त्याचे फावत होते. तब्बल वीस वर्षांपासून अधिक कालावधीपर्यंत आरोग्य यंत्रणेला या घटनेचा तपासही नसावा ही बाब प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. त्याचे राजकीय पाठीराखे कोण आहेत याचा तपास आता यंत्रणेला घ्यावा लागणार आहे.


शेअर करा