‘ बाबा तुझं पोरग भारी आहे ‘ , मुख्यमंत्र्यांकडून सरबत घेऊन अखेर उपोषण मागे

शेअर करा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर जालन्यात जाऊन उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर अखेर सतराव्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटील यांना सरबत पाजून उपोषण जरांगे पाटील यांनी सोडल्याचे जाहीर केले आहे. मराठा आरक्षण मुद्दा त्यामुळे तूर्तास थांबलेला असून मराठा आंदोलकांकडून सरकारला मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे मराठा समाजबांधवांच्या मागण्या मार्गी लावण्याचे आव्हान आता महायुती सरकारसमोर आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे तोंड भरून कौतुक केलेले असून , ‘ एक साधा आणि जिद्दी कार्यकर्ता कसा असतो हे जरांगे पाटील यांना पाहिल्यावर कळते ‘, असे देखील ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या वडिलांना देखील, ‘ बाबा तुझं पोरग भारी आहे. तुझा पोरगा स्वतःसाठी नाही तर समाजासाठी लढतोय. तो निस्वार्थी कार्यकर्ता आहे तो सच्चा आहे ‘, असे देखील ते म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की , ‘ मी मनोजला गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो त्याने वैयक्तिक फायद्यासाठी कधी कुठला विषय मांडलेला नाही. जेव्हा भेटला तेव्हा मराठा समाजाबद्दल तो आग्रही होता. एखादे आंदोलन करणे , आमरण उपोषण करणे आणि जिद्दीने पुढे नेणे याला महाराष्ट्रातील जनतेचा प्रतिसाद मिळणे खूप कमी वेळा पाहायला मिळते मात्र ज्याचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असतो त्याच्या पाठीमागे जनता उभी राहते ‘, असे देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी बोलताना , ‘ मंत्रिमंडळाची बैठक आणि सर्वपक्षीय बैठकीत आम्ही मराठा आरक्षणावर चर्चा केलेली आहे . बैठकीत लाईन ऑफ ॲक्शन ठरवली असून तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद त्यामुळे हा प्रश्न आम्ही आता लवकर मार्गी लावू. तुमचाही एक सदस्य शिंदे समितीत द्या म्हणजे तुम्हाला देखील याचे अपडेट्स मिळतील . मराठा समाजाचे आरक्षण जे गेलेले आहे ते मिळून देण्याची आमची इच्छा आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत ‘, असे देखील ते म्हणाले .


शेअर करा