बेटिंगमुळे कर्ज झालं अन गोळीबार केला , पोलीस हवालदार कोल्हारमध्ये ताब्यात

शेअर करा

महाराष्ट्रात एक अजब प्रकार ठाण्यात समोर आलेला असून 40 ते 42 लाख रुपयांच्या कर्जातून मुक्त होण्यासाठी ठाण्यातील पडघा परिसरात दोन व्यक्तींवर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील एका पोलीस हवलदाराला नगर जिल्ह्यात अटक करण्यात आलेली आहे . ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने नगर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केलेली असून 20 ऑक्टोबरपर्यंत या हवलदाराला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

उपलब्ध माहितीनुसार , सुरज ढोकरे ( वय 37 वर्ष ) असे गोळीबार करणाऱ्या या पोलीस हवालदाराचे नाव असून भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मेंदे नावाच्या गावाजवळ 13 तारखेला रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने दोन जणांवर गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता. सदर प्रकार हा चोरीच्या उद्देशाने केल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले होते.

आरोपी व्यक्ती हा मुंबई पोलीस दलातील शस्त्र दुरुस्ती कार्यशाळेत हवालदार म्हणून कार्यरत आहे . त्याच्यावर सुमारे 40 ते 42 लाख रुपयांचे कर्ज क्रिकेट बेटिंगमुळे झालेले होते आणि ते फेडण्यासाठी पैशाची गरज असल्याकारणाने त्याने हा प्रकार केल्याची कबुली दिलेली आहे. गुन्ह्यात वापरलेले पिस्टन जप्त करण्यात आलेले असून कोकण विभागाचे विशेष महानिरीक्षक प्रवीण पवार , पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने , अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दिपाली घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई अहमदनगर पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेली आहे.

आरोपी हा नगर जिल्ह्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर अहमदनगर पोलिसांनी कोल्हार बसस्थानकाजवळ सुरजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्यात तो मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल असल्याचे समोर आले. त्याला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून सुरज हा गेल्या काही वर्षापासून बेटिंग ॲपच्या माध्यमातून पैसे हरत असल्याने त्याच्यावर विविध बँक आणि पतपेढीचे ४० ते ४२ लाख रुपयांचे कर्ज झाले आणि त्याने कर्ज फेडण्यासाठी चोरीचा मार्ग निवडला होता.


शेअर करा