खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल , नगर जिल्ह्यातील घटना

शेअर करा

महाराष्ट्रात शेतकरी बांधव मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून सरकार दरबारी मात्र न्यायासाठी शेतकऱ्याची अवहेलना होताना दिसून येत आहे . शेतीच्या बांधावरून भांडण तसेच खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून हतबल झालेल्या श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथील एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , हौशीराम राजू लाटे ( वय 64 ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून 31 तारखेला श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथे त्यांनी आत्महत्या केली . बेलवंडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी मनोहर हौशीराम लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर एका महिलेसोबत पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

बाबासाहेब सदाशिव लाटे , यमुना बाबासाहेब लाटे , कुंडलिक बाबासाहेब लाटे , राजेंद्र बाबासाहेब लाटे तसेच शिवाजी रघुनाथ भोसले नावाच्या एका खाजगी सावकाराला बेलवंडी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. 

फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे , ‘ फिर्यादी तसेच त्यांच्या वडिलांना शेतीच्या बांधावरून आरोपींपैकी लाटे कुटुंबीय सतत त्रास देत होते . गावातील एका खाजगी सावकाराकडून फिर्यादी यांच्या वडिलांनी 1997 साली दहा हजार रुपये व्याजाने घेतलेले होते मात्र सावकार त्याचे तब्बल पाच लाख रुपये आज रोजी मागत होता . सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून एकतीस तारखेला आपल्या वडिलांनी दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केली ‘, असे त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सहा ते सात पानी चिठ्ठी लिहून ठेवली आणि त्यात आत्महत्या आपण आरोपींच्या त्रासाला कंटाळून करत आहोत असे म्हटले . बेलवंडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केलेला असून पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. 


शेअर करा