मनपाच्या पॅचिंगच्या कामाला ठेकेदारांकडून प्रतिसाद नाही , का होतंय असं ? 

शेअर करा

अहमदनगर शहरातील मुख्य रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दुर्दैवी झालेली आहे. खड्डे आल्यानंतर नगर आलं अशी शहराची ओळख बनू पाहत असून खड्डे बुजवण्यासाठी पॅचिंगचे काम करण्यासाठी ठेकेदार तयार होत नसल्याचे चित्र आहे. शहर आणि उपनगरातील खड्ड्यांच्या पॅचिंगसाठी 50 लाख रुपयांच्या निविदा दोनदा प्रसिद्ध करण्यात आल्या मात्र त्यास अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नाही त्यापाठीमागे ठेकेदारांना बिले अदा करण्यासाठी होत असलेला विलंब आणि महापालिकेच्या प्रशासनामध्ये चालणारी कथित टक्केवारी असल्याची चर्चा आहे. 

शहरातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली असून लोकप्रतिनिधींनी केवळ आपले ठरावीक कार्यकर्ते सांभाळण्यासाठी त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या प्रभागात सिमेंटचे रस्ते बनवलेले आहेत मात्र मुख्य रस्त्यांची परिस्थिती भयानक आहे. ज्या रस्त्यावर किरकोळ वाहतूक आहे ते रस्ते सिमेंटचे झालेले असले तरी मोठ्या प्रमाणात जिथे वाहतूक आहे त्या रस्त्यांची मात्र अक्षरशः चाळण झालेली आहे. 

तिसऱ्यांदा निविदा काढल्यानंतर तरी ठेकेदार प्रतिसाद देतील अशी महापालिकेला आशा आहे. महापालिकेच्या कामाला ठेकेदारच तयार होत नसतील तर ही परिस्थिती कुणामुळे आली यावर कधीतरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.  कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी पैसे नाहीत असे कारण अनेकदा मनपा प्रशासनाकडून पुढे करण्यात येते मात्र जर पैसेच नसतील तर कर्मचारी काम तरी नक्की कशासाठी करतात हा देखील एक प्रश्न आहे.


शेअर करा