‘ कुठवर चालायचं तळ्यात मळ्यात ‘ , निलेश लंकेंच्या भूमिकेकडे महाराष्ट्राचे लक्ष 

शेअर करा

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा महाविकास आघाडीचा पेच अजूनही सुटलेला दिसत नसून निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके विरुद्ध भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्यात संघर्ष होण्याचे जवळपास निश्चित असले तरी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आमदार निलेश लंके यांना निवडणूक लढवण्याचा आग्रह आहे पण आमदार लंके यांची सध्या मोठी गोची झालेली आहे. 

राणीताई लंके यांचे नाव निश्चित केले तर आमदार निलेश लंके आता नक्की कुणाच्या व्यासपीठावर दिसतील आणि अशा परिस्थितीत मतदारांनी तरी त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे देखील एक कोडे आहे. दुसरीकडे सुजय विखे यांची बाजू आज तरी जड दिसत असून महायुतीतील नेत्यांना आपल्या सोबत घेण्यास त्यांनी सुरुवात केलेली आहे. माफीनामा का होईना पण तशी कबुली देऊन सुजय विखे यांनी मोठे मन दाखवलेले आहे. 

अजित पवार गट सध्या भाजपसोबत असल्याने निलेश लंके यांना एकतर भाजपच्या व्यासपीठावर जावे लागेल तर पत्नी मात्र महाविकास आघाडीचा प्रचार करणार हे मतदारांना समजण्याच्या पलीकडचे राजकारण आहे . आमदार निलेश लंके आणि सुजय विखे यांच्यात थेट लढत झाली असती आणि त्यात कदाचित लंके विजयी झाले असते तर राष्ट्रीय स्तरावर निलेश लंके यांची दखल घेतली गेली असती मात्र जर पराभूत झाले असते तर विधानसभा निवडणूक लढवणे देखील आणखीन अवघड झाले असते यामुळेच निलेश लंके रिस्क घेण्यासाठी तयार नसल्याचा देखील अंदाज आहे. 

अजित पवार यांनी याआधीच आमदार निलेश लंके यांना , ‘ आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल आणि नाहीच राजीनामा दिला तर आमदारकी म्हणजेच विधानसभा सदस्यत्व अपात्र ठरुन सहा वर्षांसाठी निवडणुकीस अपात्र ठरवले जाणार ‘ असा इशारा दिलेला होता . निलेश लंके यांच्या या निर्णयाच्या विलंबामागे मागे हा इशारा देखील खूप महत्त्वाचा आहे.


शेअर करा