हाजी अन्वर खान यांच्या ‘ त्या ‘ पत्रावर नगर अर्बन बॅंकेच्या ठेवीदारांचा संताप , इतकंच असेल तर.. 

शेअर करा

ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेच्या भीतीने शहरातून गायब झालेले आहेत . भाजपशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून नगर अर्बन बँक सुस्थितीत असल्याचा दावा केल्याच्या पोस्ट सोशल मीडिया व्हायरल केल्या जात असून भाजपच्या अल्पसंख्यांक कमिटीत कार्यरत असलेले हाजी अन्वर खान यांचे एक कथित पत्र सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेले आहे . त्यांच्या या पत्रावर नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी संताप व्यक्त केलेला आहे. 

हाजी अन्वर खान यांच्या व्हायरल झालेल्या कथित पत्रामध्ये नगर अर्बन बँकेची परिस्थिती ही चांगली असल्याचा दावा करण्यात आलेला असून नगर अर्बन बँक बचाव संघर्ष समितीच्या नावाखाली सभासद आणि ठेवीदार यांची दिशाभूल करून प्रसिद्धीत राहण्यासाठी काही व्यक्ती प्रयत्न करत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटलेले आहे. नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने कामकाज देखील थांबवावे असे देखील आवाहन त्यांनी या पत्रातून केलेले आहे. हाजी अन्वर खान यांचे हे पत्र सोशल मीडियात आल्यानंतर ठेवीदारांनी त्यांच्या पत्रावर संताप व्यक्त केलेला असून , ‘ इतकीच बँकेची परिस्थिती चांगली आहे तर आधी आमच्या ठेवी परत करा ‘ असे खुले आव्हान त्यांना दिलेले आहे. 

सध्या माननीय न्यायालयात प्रकरण सुरू असून न्यायालयाचा निर्णय घेण्याआधीच आरोप प्रत्यारोप रंगत आहेत . सद्य परिस्थितीत या बँकेवर अवसायक गणेश गायकवाड यांची नियुक्ती असून गायकवाड यांच्या भूमिकेविषयी देखील ठेविदारांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केलेली आहे. आरोपी आणि त्यांची कर्जदार यांच्या अटकेसाठी न्यायालयाने अनेकदा निर्देश दिल्यावरच पोलिसांकडून कारवाई करण्यात आलेली आहे मात्र हाजी अन्वर खान यांच्या या पत्राचा रोख हा आरोपींना क्लीन चीट देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा ठेवीदारांकडून करण्यात आलेला आहे.

हाजी अन्वर खान यांचे नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी मयत दिलीप गांधी कुटुंबीय यांच्याशी स्नेहाचे संबंध आहेत . हाजी अन्वर खान गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या अल्पसंख्यांक कमिटीचे काम पाहतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाजी अन्वर खान यांचे असे पत्र म्हणजे केवळ सदर गैरव्यवहारातील आरोपींना क्लीनचीट देण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप ठेवीदारांनी करत ‘ आमची ठेवींची संपूर्ण रक्कम व्याजासहित देऊन टाका . आमची त्यानंतर कुणाशी कुठली तक्रार नाही ‘ असे म्हटलेले आहे.


शेअर करा