नगर अर्बन बँक गैरव्यवहारातील आरोपी भाजपमध्येच सक्रिय ,  ठेवीदार का बोलेनात ?

शेअर करा

नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणात काही आरोपी गजाआड झालेले असले तरी आचारसंहिता लागू झाल्यानंतर तपासात पूर्वीसारखी गती राहिलेली नाही. संबंधित गैरव्यवहार प्रकरणात भाजपचे माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी आणि त्यांचे कुटुंबीय आरोपी आहेत त्यामुळे तपासाचा वेग मंदावत असल्याची देखील शहरात चर्चा आहे. 

उद्या 30 एप्रिल रोजी या प्रकरणातील चार आरोपी संदर्भात सुनावणी असून त्यात प्रदीप पाटील, राजेंद्र डोळे , मनोज फिरोदिया आणि संगमनेर येथून अटक केलेला उद्योजक अमित पंडित यांचा समावेश आहे. अमित पंडित याच्या जामीन अर्जावर उद्या पोलिसांचे म्हणणे सादर केले जाईल तर इतर तीन अर्जांवर युक्तिवाद होणार आहे. 

नगर अर्बन बँक बेकायदा कर्ज वाटप प्रकरणात अडचणीत आलेली असून सुरुवातीला दीडशे कोटींचा घोटाळा हा फॉरेन्सिक ऑडिटमध्ये तब्बल 291 कोटींचा आढळून आला.  देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण असून बहुतांश आरोपी भाजपशी संबंधित आहेत. नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी वास्तविक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमकता दाखवत आपल्या ठेवी पदरात पाडून घेण्यासाठी भाजपच्या नेत्यांनाच धारेवर धरण्याची गरज आहे मात्र भाजपला प्रश्न विचारण्याची ठेवीदारांमध्ये हिम्मत राहिलेली नाही. 

अर्बन बँकेचे बहुतांश ठेवीदार हे वृद्ध असून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील रक्कम ही अर्बन बँकेत अडकवलेली होती.  पोलिसी कारवाईनंतर ब्रेकिंग न्यूज होत असली तरी अद्यापपर्यंत ठेवीदारांना न्यायालयाचेच उंबरठे वृद्ध अवस्थेत झिजवावे लागत आहेत . भारतीय जनता पक्षाशी संबंधित ज्या व्यक्तींनी ठेवीदारांवर ही वेळ आणली त्याच भाजपबद्दल काही ठेवीदार अद्यापही सहानुभूती बाळगून असल्याचे दुर्दैवी चित्र जिल्ह्यात आहे .

दुसरीकडे भाजपशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून नगर अर्बन बँक सुस्थितीत असल्याचा दावा करणाऱ्या पोस्ट सोशल मीडिया व्हायरल केल्या जात असून भाजपच्या अल्पसंख्यांक कमिटीत कार्यरत असलेले हाजी अन्वर खान यांचे एक कथित पत्र सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेले आहे. सदर पत्रातील भाषा पाहता हाजी अन्वर खान यांच्या या पत्राचा रोख हा आरोपींना क्लीन चीट देण्याचा प्रयत्न आहे.

राजकारण वेगळं आणि नगर अर्बन बँकेचा घोटाळा वेगळा अशा गोंडस नावाखाली जोपर्यंत दोन्ही गोष्टी वेगळ्या राहतील तोपर्यंत ठेवीदारांना न्याय मिळणे अशक्य आहे. अर्बन बँकेत जो काही घोटाळा झालेला आहे तो राजकीय सत्ता असताना सत्तेचा गैरवापर करत पोलीस कुठलीही कारवाई करणार नाहीत या अहंकारातून झालेला आहे त्यामुळे नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याला राजकारणापासून बाजूला काढणं म्हणजे एक प्रकारे आरोपींनाच मोकळे रान करून दिल्यासारखे आहे. नगर अर्बन बँक गैरव्यवहारातील आरोपी सत्तेत राहून यंत्रणेवर दबाव आणून बचावाचा प्रयत्न करतील तर ठेवीदार मात्र ‘ ते वेगळे हे वेगळं ‘ अशा दिवास्वप्नात जगतील तर कायमच सत्ताधारी नेत्यांचे पारडे जड राहणार आहे..


शेअर करा