‘ तुतारी ‘ चिन्हाबद्दल निलेश लंके यांचे कार्यकर्त्यांना महत्वाचे आवाहन , म्हणाले की…  

शेअर करा

नगर दक्षिणचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची सध्या स्वाभिमान जनसंवाद यात्रा सुरू असून मतदार संघातील विविध गावांमध्ये त्यांची ही यात्रा विनाखंड सुरू आहे.  निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लंके यांनी गावोगावी भेट देऊन मतदार संघातील मतदारांशी संवाद साधण्याचा सध्या धडाका लावलेला असून लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लंके मतदारसंघातील वेगवेगळ्या गावांमध्ये सध्या दौरे करत आहेत. 

निलेश लंके यांच्या जनसंवाद यात्रेसाठी मोठ्या स्वरूपाचे हायफाय सेटअप आणि झगमगाट नसून निलेश लंके यांचे भाषण ऐकण्यासाठी अक्षरश: उभे राहून तासंतास मतदार सध्या त्यांच्या बोलण्याची वाट पाहतात.  त्या त्या गावातील प्रश्न निलेश लंके ऐकल्यानंतर त्या अनुषंगाने आपण जे काही करू शकतो याविषयी ते ग्रामस्थांना मार्गदर्शन करतात सोबतच त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन काय करता येऊ शकेल याविषयी देखील आश्वासन देतात. 

पारगाव सुद्रिक येथे जनसंवाद यात्रेत बोलताना निलेश लंके यांनी , ‘ ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई असून निवडणूक आता नागरिकांनीच हाती घेतलेली आहे.  यापूर्वी ज्या लोकप्रतिनिधीला तुम्ही निवडून दिलं त्याने तुमच्यासाठी काय केलं याचा विचार करा आणि आगामी निवडणुकीत तुतारीच्या चिन्हाचे बटन दाबा. तुतारी चिन्ह उशिरा मिळालेले असल्याने अनेक जणांना या चिन्हाची माहिती नाही म्हणून कार्यकर्त्यांनी तसेच मतदारांनी आपल्या परिसरातील इतर व्यक्तींना चिन्हाची माहिती द्यावी . लोकशाही वाचवण्यासाठीची ही निवडणूक आहे ,’ असे देखील आवाहन त्यांनी केले . 

निलेश लंके म्हणाले की , ‘ पारगाव सुद्रिक इथे सुमारे १७०० एकरमध्ये द्राक्षाची लागवड केली जाते अशा परिस्थितीत येथील नागरिकांना डाळ आणि तांदूळ वाटून सध्याचे लोकप्रतिनिधी काय संदेश देऊ इच्छित आहेत. तुम्हाला इंग्लिश बोलणारा खासदार हवा की तुमचे प्रश्न लोकसभेत मांडणारा खासदार हवा ? ‘ असा देखील प्रश्न त्यांनी यावेळी मतदारांना विचारला त्यावर सर्वांनी आमचे प्रश्न लोकसभेत मांडणारा खासदार हवा असे उत्तर दिले. 

निलेश लंके यांनी यावेळी बोलताना , ‘ केवळ निवडून येणे हे माझे मेरीट नाही तर निवडून आल्यानंतर मी काय काम केले हा निकष महत्त्वाचा आहे. केवळ मतांसाठी काहीही आश्वासन देणे हा आपला पिंड नाही तर जे बोलतो ते करून दाखवतो अशी माझी कार्यशैली आहे ,’ असे देखील ते पुढे म्हणाले.


शेअर करा