‘ त्या पीआयला जाऊन सांग तुमचा बाप येतोय ‘ , निलेश लंके असे का म्हणाले ?

शेअर करा

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या एका व्हिडिओ क्लिपची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू असून त्यामध्ये त्यांनी ‘ त्या पीआयला जाऊन सांग तुमचा बाप येतोय ‘ असे म्हटलेले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना एकतर्फी त्रास दिला जात असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत त्यावर संतप्त झालेले लंके यांनी बोलताना वरील भाषा वापरलेली आहे . शेवगाव इथे देखील बोलताना निलेश लंके यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिलेला होता. निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांकडून लंके यांच्यासोबत कोणी दिसला की त्याला दमदाटी मारहाण अशा स्वरूपाच्या घटना नित्याच्या झालेल्या आहेत असा देखील आरोप करण्यात येत आहे. 

महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निलेश लंके यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर लंके यांच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्रास दिल्याचे प्रकार समोर आलेले आहेत. पाथर्डीसह इतरही काही ठिकाणी लंके यांचे काम करतो का ? असे म्हणत कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचे प्रकार घडलेले आहेत. नगर शहरात 60000 रुपयांची कॅश सापडली म्हणून लंके यांच्या जवळच्या कार्यकर्त्याच्या विरोधात कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. राधाकृष्ण विखे पाटील आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी प्रशासनावर दबाव आणत हे सर्व करत असल्याचा आरोप लंके यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. निलेश लंके यांनी आत्तापर्यंत अशा भाषेचा वापर करणे टाळलेले होते मात्र अखेर संयमाचा बांध तुटला आणि त्यांनी वरील भाषेत पीआयला इशारा दिला. 

निलेश लंके यांना कुठल्याही परिस्थितीत पराभूत करण्यासाठी महायुतीने कंबर कसलेली असून चक्क मोदींना नगर शहरात पाचारण करण्यात येणार आहे . सहा मे रोजी मोदी यांची शहरात सभा होणार असून नगरमधील भाजप कार्यकर्त्यांनी सभेची जय्यत तयारी सुरू केलेली आहे. सभा कुठे होणार हे अद्यापपर्यंत निश्चित झालेले नाही. 

महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी नगर शहर , राहुरी आणि शेवगाव इथे प्रचार सभा घेतलेल्या असून तीनही सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची धाकधूक वाढलेली असून पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर शहरातील वातावरण बदलेल या एकमेव आशेवर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आहेत. सद्य परिस्थिती पाहता नागरिक महागाई , बेरोजगारी , महिला सुरक्षा या प्रश्नांसाठी आक्रमक असून नेहमीप्रमाणे मोदींच्या हिंदू मुस्लिम ,पाकिस्तान ,चीन ,नेहरू ,काँग्रेस, गांधी या त्याच त्या शब्दांचा मतदारांवर कुठलाच परिणाम होत नाही. 


शेअर करा