काळ्या कोटावरील ‘ काळेकुट्ट ‘ डाग , वकिलांवरील हल्ल्याची दुसरी बाजू काय ? 

शेअर करा

अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात संध्याकाळी पाचच्या सुमारास एका ज्येष्ठ वकिलांवर हल्ला करण्यात आला. सदर हल्ला हा त्यांच्याच पक्षकाराने केल्याची प्राथमिक चर्चा असून गेल्या काही महिन्यांमध्ये वकिलांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढलेले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथे एका वकील दांपत्याची अत्यंत अमानुषपणे हत्या करण्यात आली होती आणि त्या प्रकरणाचा देखील सध्या सीआयडी तपास करत आहे.

वकील असो किंवा इतर कुठलाही व्यक्ती असो त्यांच्यावरील हल्ल्याचे कदापि समर्थन केले जाऊ शकत नाही मात्र वकील आणि डॉक्टर ही दोन्ही प्रोफेशन तशी नोबल प्रोफेशन म्हणून गणली जातात म्हणून त्यांची चर्चा जास्त होते..वकील आणि डॉक्टर ही दोन्ही प्रोफेशन माणसाच्या जगण्याच्या मूलभूत हक्काशीच निगडित आहेत आणि म्हणूनच त्यांना नोबल प्रोफेशनचा दर्जा दिलेला आहे मात्र इतर क्षेत्रात जशी स्पर्धा वाढलेली आहे तशीच या क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात स्पर्धा गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेली पहायला मिळत आहे. 

डॉक्टरांबद्दल हल्ल्याविषयी कायदा करण्यात आला मात्र वकिलांबाबत असा कायदा अद्याप झालेला नाही. राहुरी येथील दाम्पत्याच्या हत्येनंतर वकील बंधू-भगिनींनी न्यायालयासमोर काही दिवस कामकाजात सहभागी न होता आंदोलन केले मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.  प्रचंड स्पर्धेचा सामना करत असलेल्या वकिलांना अनेकदा पक्षकार व्यक्तीला आपल्या बाजूने वळवण्यासाठी आश्वासने दिली जातात मात्र ही आश्वासने कायद्याच्या चौकटीत कितपत टिकतील याचे ज्ञान समोरील व्यक्तीला नसते मात्र प्रत्यक्ष न्यायालयासमोर प्रकरण गेल्यानंतर पक्षकाराचा भ्रमनिरास होतो आणि त्यातून वाद वाढतात. 

बार कौन्सिलच्या नियमाप्रमाणे वकिलांना त्यांच्या कामाची जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे मात्र त्याचेही उल्लंघन अनेक नामांकित वकील करतात आणि माध्यमांसमोर बाइट देताना ‘ खुनाचा आरोपी सोडवला ‘ , ‘ बलात्काराचा आरोपी सोडवला ‘ अशा पद्धतीने स्वतःची जाहिरात करतात. ‘ खुनाच्या आरोपीला गजाआड केले ‘, ‘ बलात्काराच्या आरोपीला शिक्षा झाली ‘ अशा बातम्या समाजामध्ये कायदा हातात न घेण्याविषयी संदेश देतात मात्र जर कुणी खुनाचा आरोपी सोडवला आणि बलात्काराचा आरोपी सोडवला अशा पद्धतीने स्वतःची जाहिरात करत असतील तर ही बाब गंभीर आहे. असल्या जाहिरातबहाद्दर वकिलांवर वास्तविक बार कौन्सिलने तात्काळ कारवाई करत त्यांना प्रॅक्टिस करण्यास बंदी करायला हवी अन्यथा उद्या हेच वकील ‘ खून करून या पाच लाखात तुम्हाला सोडवतो ‘ अशा स्वरूपाची जाहिरात करायला देखील कमी करणार नाहीत किंबहुना आजही खाजगीत अशी जाहिरात करतात. 

ज्या व्यक्तींवर खरोखर अन्याय झालेला आहे त्या व्यक्तींना अशा महाभागांच्या बातमीयुक्त पाचशे हजार रुपयांत दिलेल्या जाहिराती पाहिल्यानंतर मनात काय वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही. काय खरे काय खोटे हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयाला आहे मात्र काही ठराविक पट्टीतल्या पोलिसांशी संगनमत करूनच अनेकदा समोरील व्यक्तीला कायद्याच्या चौकटीत अडकवले जाते. आपण कोणीतरी खास आहोत या स्वतःच्याच अहंकारांमध्ये बेडकासारख्या फुगलेल्या वकिलांना समोरील व्यक्तीच्या अडचणींशी काहीही घेणे देणे नसते अशा परिस्थितीत प्रतिवादीपेक्षा त्याच्या वकिलाचाच जास्त त्रास समोरील व्यक्तीला सहन करावा लागतो त्यातून आकस वाढत जाऊन एखाद्या दिवशी त्याचा स्फोट होतो . धक्कादायक म्हणजे समोरील व्यक्तीला त्रास देण्याच्या कौशल्याला अशा वकिलांकडून आमचे व्यावसायिक कौशल्य आहे असे म्हटले जाते. एखादा चोर सफाईने दरोडा टाकतो म्हणून त्याच्या कौशल्याचे कौतुक करण्याचे कारण नाही कारण त्याचे काम समाजासाठी घातक आहे.

कुठल्याच न्यायालयात कुणी हौसेने येत नाही याचे भान वकिलांनी ठेवण्याची गरज आहे मात्र प्रोफेशनलीझम नावाचा दुर्धर आजार जडल्यानंतर काय खरे काय खोटे यातील बारीक रेषा पुसट होत जाते अन फक्त स्वतःची तिजोरी भरून घेणे याच उद्देशाने काही महाभाग काम करतात. वकिली प्रोफेशनला स्वातंत्र्य पूर्वकाळापासूनचा एक मोठा इतिहास आहे मात्र त्याला काळीमा फासण्याचे काम काही वकील गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत मात्र कुणीच विरोधात बोलत नसल्याकारणाने त्यांचे फावले जात आहे. पोलिसांमध्ये दाखल केलेले पुरावे न्यायालयापर्यंत येऊ द्यायचे नाहीत , तक्रारदार व्यक्तींवर वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणायचा , पोलिसांशी संगनमत करून गुन्ह्याची कलमे वाढवायची , समोरील व्यक्तीला मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने खोट्या केसेस दाखल करायच्या , न्यायालयात जाणीवपूर्वक हेतूपुरस्पर चकरा मारण्यास भाग पाडायचे असेही प्रकार करणारे महाभाग कमी नाहीत. ज्या व्यक्तीवर अन्याय होतो त्याचे कुणीच ऐकून घेत नाही त्यामुळे अखेर हतबल झालेले व्यक्ती कायदा हातात घेतात. 

अहमदनगर जिल्हा न्यायालयामध्ये बार कौन्सिलचे सभासद असणाऱ्या व्यक्तींची संख्या सुमारे एक हजारांपेक्षा जास्त आहे आणि वकिलांपर्यंत येणारी प्रकरणे यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात काही दिवसांमध्ये वाढलेले आहे मात्र त्या तुलनेत न्यायालयांची संख्या वाढलेली नाही त्यामुळे प्रकरणास विलंब होणे अशाही घटना घडतात. गुन्हेगारी क्षेत्रातील व्यक्तींशी वकील व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात संबंध येतो मात्र अनेकदा समोरील व्यक्तीला हव्या असलेल्या अपेक्षा देखील वकील पूर्ण करू शकत नाहीत आणि त्यानंतर अशा घटना वादाचे कारण ठरतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवन मरणाचा आणि जगण्याच्या मूलभूत हक्काचा प्रश्न असतो त्यावेळी इतर फाफटपसारा अन खोटी आश्वासने आणि वकील महाशयांच्या स्वतःच्या बढाया ऐकण्यात समोरील व्यक्तीला कुठलाही रस नसतो मात्र रोजचाच भाग म्हणून भावनाशून्य झालेले वकील असे प्रकार रोज करत असतात . केस हातात येईपर्यंत गोड गोड बोलायचे त्यानंतर फोन उचलायचे नाहीत , समोरील व्यक्तीचे ऐकूनच घ्यायचे नाही , खोटी आश्वासने द्यायची अशा प्रकारांना वैतागून अखेर हल्ल्याच्या घटना घडतात. आणखीन एक विशेष बाब कुठेच न्याय मिळत नाही म्हणून हतबल झाल्यानंतर न्यायालयाचा दरवाजा माणूस ठोठावतो मात्र तिथे देखील न्याय मिळण्याची आशा संपली की मग घडतात अशा घटना.. माननीय न्यायव्यवस्थेबद्दल कुठल्याही पद्धतीचा संशय नाही किंवा कुठल्याही पद्धतीचा आकस किंवा अविश्वासही नाही सदर विषय हा फक्त माननीय न्यायालयाच्या खुर्चीच्या समोर चालणाऱ्या कामकाजावर आणि गैरप्रकारांबद्दल आहे. 


शेअर करा