नगर शहरातुन बेपत्ता झालेले चितळेरोड येथील व्यावसायिक दीपक परदेशी यांचा अखेर मृतदेह निंबळक बायपासजवळ एका नाल्यात आढळून आलेला आहे. खंडणीच्या कारणावरून आरोपींनी हे कृत्य केलेले असून त्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
नगर शहरातील व्यापारी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दीपक परदेशी यांची हत्या ही पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे झालेली असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेले दीपक परदेशी यांचा मृतदेह 22 दिवसानंतर हाती आला सोबतच यातील मुख्य आरोपी हा बडतर्फ पोलीस कर्मचारी असल्याने पोलिसांच्या अंतर्गत गुन्हेगारी संबंधावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे असे म्हटलेले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना या संदर्भात निवेदन देखील देण्यात आलेले असून तोफखाना पोलिसांची सखोल चौकशी करून यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे ? याचा तपास करावा आणि आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आलेली आहे . निवेदन देतेवेळी शहरातील ज्येष्ठ नेते माणिक विधाते , सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे , व्यापारी संजय चोपडा , प्रमोद बोराडे , कांता अष्टेकर , नगरसेवक प्रकाश भागानगरे हे देखील उपस्थित होते.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिता आरोपींची नावे सागर गिताराम मोरे (रा. ब्राह्मणी) आणि किरण बबन कोळपे (रा. विळद, ता. अहिल्यानगर) अशी असून तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल गायधनी यांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे या दोघांना राहुरी परिसरातून अटक केली.
दीपक परदेशी यांनी विळद येथील काही लोकांना उसने दिलेले पैसे अडकले होते आणि या पैशांवरून वाद सुरू होता. किरण कोळपे याला दीपक परदेशी यांनी दिलेल्या पैशाची वसुली करण्याचे काम दिलेले होते मात्र ते अवघड होत असल्याकारणाने आरोपींनी दीपक परदेशी यांच्याकडेच थेट १० कोटी रुपयांची मागणी केली आणि हे पैसे मिळवण्यासाठी त्यांच्याच अपहरणाचा कट रचला . परदेशी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने संशयितांनी त्यांचा गळा आवळून खून केला असे तपासात समोर आले आहे.
आरोपींची मृतदेह लपवण्यासाठी त्यांनी तो निंबळक बायपासजवळील नाल्यात फेकून दिला. धक्कादायक बाब म्हणजे या खून प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला किरण बबन कोळपे हा 2008 मध्ये पोलीस दलात भरती झालेला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल असून 2023 मध्ये राहुरी पोलिसात त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता. पोलीस दलातून बडतर्फ झाल्यानंतर त्याने एका महिला वकिलाच्या घरात घुसून दोन लाख रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटला होता आणि वैद्यकीय चाचणीच्या वेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला होता. कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर त्याला कल्याण येथून अटक करण्यात आली होती.