भूमाता ब्रिगेडने शिर्डी संस्थानच्या ‘ त्या ‘ बोर्डला फासले काळे

शेअर करा

भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शिर्डीतील साई संस्थानने ड्रेसकोड बद्दल लावलेल्या वादग्रस्त बोर्डवर आज गुरुवारी काळा रंग फेकला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ड्रेसकोड नियमाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.

शिर्डी संस्थानाच्या माध्यमातून भक्तांनी भारतीय वेशभूषेत यावे, असे बोर्ड मंदिर प्रवेशद्वारावर लावले होते. अशा पद्धतीचा बोर्ड लावणे म्हणजे संविधानाने दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार भक्तांकडून हिरावून घेण्याचा प्रकार आहे, असे सांगत भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी विरोध केला होता. तसेच साई संस्थांनला हा बोर्ड काढून टाकावा, म्हणून पत्र पाठवले होते मात्र संस्थानाच्या वतीने हा बोर्ड काढण्यात आला नव्हता.

तृप्ती देसाई या स्वतः हा बोर्ड काढण्यासाठी शिर्डी येथे डिसेंबर महिन्यात येत असताना सुपा येथे त्यांना अडविण्यात आले होते, त्यावेळी ३१ डिसेंबर पर्यंत संस्थांनी बोर्ड काढावा ,अन्यथा आम्ही पुन्हा येउन तो बोर्ड काढू, असा इशारा देसाई यांनी दिला होता. मात्र संस्थानने देखील ड्रेस कोड बाबत लावलेला बोर्ड काढला नाही. त्यामुळे आज अखेर गुरुवारी भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी सव्वा पाचच्या दरम्यान शिर्डीत जाऊन या बोर्डवर काळा रंग फेकला त्याचवेळी त्यांनी संघटनेच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली.

शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर प्रवेशद्वारांवर पोषाखाबाबत बोर्ड लावण्यात आला होता. ‘सभ्यतापूर्ण पोषाख अथवा भारतीय संस्कृतीस अनुसरुन पोषाख परिधान करून मंदिरात दर्शनाकरिता यावे’, असे आवाहन अर्थात विनंती या बोर्डद्वारे भाविकांना शिर्डी संस्थानकडून करण्यात आली होती. या आवाहनाला साईभक्तांचा चांगला प्रतिसाद देखील मिळत होता मात्र यामुळे व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार भक्तांकडून हिरावून घेण्याचा प्रकार होत आहे, असे भूमाता ब्रिगेडचे म्हणणे आहे .


शेअर करा