‘ आग लागली की लावली ? ‘ भाजप नव्हे तर आणखी एका पक्षाकडून संशय व्यक्त

शेअर करा

सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या, वॉटर टँक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोरोनावरील कोविशील्ड लस तयार करणारा भाग सुरक्षित असून त्या ठिकाणी आग लागली नसल्याची माहिती सीरमनं दिली आहे. सदर दुर्घटनेमध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून ह्या घटनेवर देखील आता राजकारण पेटू लागलेले आहे.

भाजपच्या मुक्ता टिळक यांच्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील या आगीबद्दल शंका व्यक्त केली आहे .प्रकाश आंबेडकर यांनी मुंबईतील पत्रकार परिषद घेतली त्यावेळी शंका उपस्थित करताना, ‘सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली हे मला व्हॉट्स ऍप मेसेज आणि सोशल मीडियावरुन समजलं. ही आग लागली आहे की लावलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनीदेखील ‘दीडच्या सुमारास सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीत आग लागल्याची माहिती मिळत आहे. कोरोना लसीचं उत्पादन सुरू असलेल्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी झालेली नाही. प्रथमदर्शनी हा घातपाताचा प्रकार वाटत आहे. ज्या ठिकाणी आग लागली आहे, त्या परिसरात कोरोना लस तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे हा घातपाताचा प्रकार वाटत आहे’, असे म्हटले होते.

सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीमध्ये दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. मांजरी भागात असलेल्या सीरमच्या इमारतीत बीसीजी विभाग आहे. या भागात बीसीजीची लस तयार करण्याचं काम चालतं. कोरोना लसीचं संशोधन आणि उत्पादनाचा विभाग या ठिकाणी नसल्याचं चिंतेची बाब नसल्याचं सीरमकडून सांगण्यात आलं. आग लागलेल्या भागात चार कर्मचारी अडकले होते. त्यापैकी तिघांची सुटका करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

आगीचा आणि कोरोनावरील कोव्हिशिल्ड लशीचा कोणताही संबंध नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं. कोव्हिशील्ड लस सुरक्षित असल्याचं ते म्हणाले. पण या आगीत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती संध्याकाळी समोर आली. इमारतीत वेल्डिंगचं काम सुरू असताना ही आग लागली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असा सीरम इन्स्टिट्यूटचा नावलौकिक आहे. काही दिवसांपूर्वीच सीरमने कोरोना प्रतिबंधक असलेली कोविशिल्ड लस देशभरात वितरणासाठी उपलब्ध करून दिली आहे. कोविशील्डच्या लसीकरणाची मोहीम देशात सुरू आहे. तसेच, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लस उत्पादन करण्यासाठी सीरम कंपनी प्रयत्नशील आहे, अशातच हा प्रकार घडल्याने यावर राजकारण पेटू लागलेले आहे .


शेअर करा