भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्या ‘ त्या ‘ वक्तव्याचा रोहित पवार यांनी घेतला समाचार

शेअर करा

‘ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या जेजुरी येथील भाषणावर टीका करणारांनी ते नीट ऐकलेले दिसत नाही. या भाषणातून आणि यापूर्वीही पवारांनी अहिल्याबाई होळकर यांचा सन्मानच केला आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यापूर्वीच त्यांनी मला अहिल्यादेवींबद्दल सांगून जबाबदारीने काम करण्याचा सल्ला दिला होता. आम्ही अहिल्यादेवींचा सन्मानच करत आलो आहोत,’ असे सणसणीत उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांना दिले आहे.

नगरमध्ये रोहित पवार पत्रकारांशी बोलत असताना ते म्हणाले, ‘ शरद पवार यांनी होळकर यांचे जन्मस्थान आणि माझा मतदारसंघ यासंबंधी जो उल्लेख केला आहे तो नीट ऐकला पाहिजे. त्यांनी या भाषणातून अहिल्यादेवींचा सन्मानच केला आहे. एवढचे नाही तर जेव्हा मी कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवायची ठरले तेव्हाच मला पवार यांनी अहिल्यादेवींची आठवण करून दिली होती ‘

‘ जामखेड मतदारसंघातील चोंडी गावात अहिल्यादेवींचा जन्म झाला आहे. तेथे काम करण्याची तुला संधी मिळणार आहे. त्यांनी जसे पाणी आणि अन्य क्षेत्रांत काम करून जनतेची सेवा केली, त्यातून आदर्श घेऊन काम कर. असा सल्ला मला पवार यांनी तेव्हाच दिला होता. मी आजही त्याच जबाबदारीने काम करीत आहे. त्यामुळे यासंबंधाने होणाऱ्या टीकेकडे दुर्लक्षच केलेले बरे.’ असेही पवार यांनी सांगितले.

राम शिंदे यांनी याआधी, ” पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्म आपल्या नातवाच्या (रोहित पवार) मतदारसंघात झाला आहे, असं बोलून नातवाचा मतदारसंघ अहिल्यादेवींपेक्षा श्रेष्ठ आहे, असं शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलं आहे. त्यांनी असं बोलणं हा अहिल्यादेवी यांचा अपमान आहे. शरद पवार यांची जीभ घसरलीय असं मी म्हणेन ” अशी शरद पवारांवर टीका केली होती त्याला रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे .


शेअर करा