अखेर नागपूरमध्ये लॉकडाऊन जाहीर, काय सुरु काय बंद ? घ्या जाणून

शेअर करा

नागपूरकरांना पुन्हा एकदा लॉकडाऊनचा सामना करावा लागणार आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता प्रशासनाने 15 ते 21 मार्च 2021 दरम्यान नागपुरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज याबाबत घोषणा केली. त्यांनी यावेळी नागरिकांना कारणाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.

15 ते 21 मार्च दरम्यान कडक संचारबंदी लागू करण्यात येणार असून, नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत हे लॉकडाऊन लागू केले जाणार आहे. नागपूर महानगरपालिका हद्दीसह कामठी, हिंगणा आणि वाडी हे तीन भाग पोलीस आयुक्त कार्यालय हद्दीत आहेत, याठिकाणी देखील लॉकडाऊन असणार आहे.

दरम्यानच्या काळात उद्योग सुरू राहतील, सरकारी कार्यालय 25 टक्के उपस्थिती मध्ये सुरू राहतील आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील ( भाजी, दूध, दवाखाने, बँक, मीडिया ) अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली आहे. या कालावधी दरम्यान सर्व खाजगी कार्यालय बंद राहतील तर सरकारी कार्यालयं 25 टक्के उपस्थितीत सुरू राहणार आहेत. दारू दुकाने बंद राहतील मात्र दारूची ऑनलाइन घरपोच सेवा सुरू राहणार आहे. फ्रंटलाइन कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू राहणार आहे. लसीकरणसाठी जाणाऱ्यांना नोंदणीचा कागद घेऊन केंद्रावर जाणे अनिवार्य असणार आहे.

यावेळी नितीन राऊत म्हणाले की, ‘एक वर्षांपूर्वी आजच नागपूरात कोरोना चा पहिला रुग्णाला आढळला होता. तेव्हा पासून आजवर 1 लाख 62 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी 4 हजार 215 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्ये स्थिती नियंत्रणात होती मात्र आता पुन्हा रुग्ण वाढत आहेत. आज आम्ही प्रशासनासोबत बैठक घेतली. नागपूर शहरात रुग्णांची संख्या मोठी आढळत आहे. शिवाय काही ग्रामीण भागात ही रुग्ण आढळत आहे. काही ठिकाणी बाधित रुग्ण बाहेर फिरत आहेत. काही ठिकाणी आयसोलेशनच्या नियमांचा उल्लंघन केलं जात आहे. त्यामुळे संक्रमण वाढत आहे.’


शेअर करा