अंबानींच्या घराबाहेरच्या ‘ त्या ‘ इनोव्हा गाडीबद्दल एनआयएचा खळबळजनक दावा

शेअर करा

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन्ही गाड्या मुंबई पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या (CIU) असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली. सचिन वाझे यांनी स्वत:च राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या एनआयए अधिकाऱ्यांना या इनोव्हा कारबद्दल माहिती दिली. त्यानंतर एनआयएने ही कार ताब्यात घेऊन कार्यालयात आणली आहे .

अंबानी यांच्या घराबाहेर ज्या कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती, ती स्कॉर्पिओ कारही पोलिसांचीच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. हीच स्कॉर्पिओ गाडी अन्वय नाईक प्रकरणातील आरोपी अर्णव गोस्वामी यास अटक करताना वापरण्यात आल्याचेही सांगितले जात आहे. त्यावेळी या गाडीवर बनावट नंबरप्लेट लावण्यात आली होती. या नव्या माहितीमुळे आता हिरेन मनसुख मृत्यूप्रकरण आणि अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्फोटक प्रकरणातील संशयाचे धुके आणखी वाढले आहे.

मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली. त्यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली, असा आरोप एनआयएने केला आहे.

सचिन वाझेंनी अंबानींच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका बजावली, असा आरोप करण्यात आला आहे. या आरोपाखाली त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत. गेल्या 15 दिवसांत अंबानी स्फोटके प्रकरणातही सगळ्यात मोठी घडामोड म्हणून पाहिली जाते आहे. त्यामुळेच सचिन वाझेंच्या अटकेनं खळबळ उडाली आहे.

मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ही कारवाई केली आहे . मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकांचे गूढ तसेच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण देखील आता लवकरच बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

एनआयए कडून सचिन वाझे यांची शनिवारी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. कंबाला हिल येथील एनआयए कार्यालयात सचिन वाझे सकाळी ११.३० च्या सुमारास गेले होते. तिथे तब्बल १२ तास मॅरेथॉन चौकशी केल्यानंतर रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी वाझे यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत एनआयएच्या एका अधिकाऱ्याने अधिकृत माहिती दिली आहे.

अंबानी यांच्या घराजवळ ज्या कारमध्ये स्फोटकं ठेवण्यात आली होती त्या कारचा मालक मनसुख हिरन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएस मार्फत सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. त्यापाठोपाठ एनआयएने स्फोटकांप्रकरणी सचिन वाझे यांची चौकशी सुरू केली होती. त्यामुळे संभाव्य अटक टाळण्यासाठी वाझे यांनी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात शुक्रवारी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली असता वाझे यांना अंतरिम संरक्षण देण्यास ठाणे न्यायालयाने नकार दिला होता. प्रथमदर्शनी मनसुख यांच्या मृत्यू प्रकरणात वाझे यांचा सहभाग असल्याचे दिसते असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले होते. दुसरीकडे वाझे यांची एनआयएकडून चौकशी सुरू होती.रात्री उशिरा वाझे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

मनसुख हिरेन यांच्या पत्नीचे सचिन वाझेंवर आरोप काय आहे ?

” सचिव वाझे माझ्या पतीला ओळखत होते. नोव्हेंबर महिन्यात माझ्या पतीने गाडी वाझे यांना वापरण्यासाठी दिली होती. वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात गाडी परत दिली. 26 फेब्रुवारीला सचिन वाझेंनी माझ्या पतीला चौकशीसाठी नेलं. संध्याकाळी ते त्यांच्यासोबतच घरी आले. पुढे दोन दिवस माझे पती सचिन वाझेंसोबत जात होते आणि येत होते. वाझेंनी माझ्या पतीला या प्रकरणात अटक हो. तुला 2-3 दिवसात जामिनावर बाहेर काढतो,असे सांगितले होते. माझे पती मनसुख यांचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केल्याचा मला संशय आहे “

प्रसारमाध्यमांनी सचिन वाझे यांना फडणवीसांच्या आरोपांबाबत विचारलं असता, गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा नाही, असं वाझे म्हणाले. गाडी माझ्याकडे असणं आणि नसणं यात गुन्हा काय? गाडी माझ्याकडं असणं हा आरोप आहे का? यात आरोप काय? आरोप काय आहेत त्यात ते तर सांगा, असं वाझे म्हणाले. यावेळी त्यांना विमला हिरेन यांनी जबाबात तुमचं नाव घेतलं आहे, त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे, असं विचारण्यात आलं. त्यावर मी जबाब वाचला नाही. त्यांनी काही आरोप केला जबाब वाचतो आणि त्यानंतर उत्तर देतो, असं ते म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याजवळ गेल्या महिन्यात कार आढळली होती. तिची तपासणी केली असता, त्यात जिलेटिनच्या कांड्या आढळल्या होत्या. त्यामुळे खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास सुरू होता. ही कार कुणाची आहे याची माहिती उघड झाली होती. मनसुख हिरेन हे या कारचे मालक असल्याचे आढळून आले होते मात्र यात देखील ही गाडी न्यूटन नावाच्या माणसाची असून ती हिरेन यांच्याकडे इंटेरियरच्या कामासाठी दिल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले होते. त्यानंतर मनसुख हिरेन मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजरही झाले होते .

मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजर झाल्यानंतर सदर गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांनाही सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला . त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे.

मनसुख हिरेन यांची डेड बॉडी स्वतः पाहिल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी सचिन वझे हे पोस्टमार्टेम सुरु असताना तिथे का उपस्थित होते ? यावर देखील आक्षेप घेतला आहे. ‘ आपले वडील कधीच आत्महत्या करणार नाहीत ‘ असा दावा देखील हिरेन यांच्या मुलाने एका निकटवर्तीयांशी बोलताना केलेला आहे . सदर प्रकरणाचा तपास हा एनआयएकडे देण्याची मागणी फडणवीस यांनी केली होती .

सचिन वझे कोण आहेत ?

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता.

सचिन वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले. काही चॅनेल्सवर ते शिवसेनेची भूमिका मांडताना देखील दिसले होते.

सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे. सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अ‍ॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते.

त्यानंतर महाविकास आघाडीचे राज्यात सरकार स्थापन झाल्यावर सचिन वाझे यांचे निलंबन रद्द झाले आणि त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यानंतर अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामींना अटक करणाऱ्या पोलिसांच्या टीमचे नेतृत्व वाझे यांनीच केले. तर अर्णब गोस्वामींना अडचणीत आणणाऱ्या टीआरपी घोटाळ्याची चौकशी देखील सचिन वाझे यांच्याकडेच आहे. त्यामुळे सचिन वाझे यांच्या निमित्ताने भाजप सरकारवर निशाणा साधत असल्याची देखील टीका होत आहेत . ‘ भाजप समर्थक असलेला पत्रकार अर्णब गोस्वामी याला अटक केली म्हणून तुमचा सचिन वाझेंवर राग आहे का ? ‘ असा प्रश्न देखील अनिल देशमुख यांनी फडणवीस यांना विचारला होता.


शेअर करा