“सचिन वाझेंचे गॉडफादर उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या आधी त्यांनी राजीनामा द्यावा”

शेअर करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर आहेत. या सर्व प्रकरणाला मुख्यमंत्रीच जबाबदार असून त्यांना एक दिवसही खुर्चीवर राहण्याचा अधिकार नाही, असं सांगतानाच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आधी मुख्यमंत्र्यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे तसेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू कारण्यासाठी आपण अमित शाह यांना पत्र लिहिल्याचे देखील ते म्हणाले.

नारायण राणे यांनी संसद भवन परिसरात मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही मागणी केली. सचिन वाझे आधी सस्पेंड होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना डिपार्टमेंटमध्ये घेतलं. तसेच त्यांच्याकडे क्राईम इंटेलिजन्स यूनिटची जबाबदारीही दिली. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच वाझे पोलीस दलात परत आले. यावरून मुख्यमंत्री हेच वाझेंचे गॉडफादर असल्याचं दिसून येतं, असं नारायण राणे म्हणाले.

वाझेंकडेच महत्त्वाची प्रकरणं कशी?

मुख्यमंत्र्यांनी वाझेंकडून सर्व कामे करून घेतली आहेत. त्यामुळे अनिल देशमुखांच्या आधी मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरेंना वर्षभर चांगलं काम करता आलं नाही. सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन, पूजा चव्हाण आणि मनसुख हिरेन यांच्या हत्या झाल्या. यातील बहुतेक प्रकरणं वाझेंकडे देण्यात आली होती. कोणताच संबंध नसतानाही वाझेंकडे ही प्रकरणं का देण्यात आली? असा सवालही त्यांनी केला.

वाझेंचा गॉडफादर कोणीच नसल्याचं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून स्पष्ट करण्यात आलं होतं. त्याबाबत राणे यांना विचारलं असता त्यांनी थेट संजय राऊत आणि उद्वव ठाकरेंवर टीका केली. ‘सामना’द्वारे राऊत मुख्यमंत्र्यांना वाचवण्याचं काम करत आहेत. चुकीचं काही घडलं असेल तरीही मुख्यमंत्र्यांचा बचाव केला जातो. राऊत मुख्यमंत्र्यांचा बचाव करणारच. ते त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, असंही ते म्हणाले.

भाजपकडून उद्धव ठाकरेंना केलं जातेय टार्गेट

सचिन वाझे यांच्यामुळे ‘मातोश्री’ अडचणीत आली आहे. त्यामुळे सचिन वाझे यांचीही हिरेन मनसुखप्रमाणे हत्या होऊ शकते. सचिन वाझे मुंबई पोलिसांच्या ताब्यात सुरक्षित नाही, असा धक्कादायक आरोप भाजपचे आमदार रवी राणा यांनीही केला आहे . याआधी खासदार नवनीत राणा यांनी देखील अशाच स्वरूपाचा आरोप केल्यामुळे राज्यात वाझे प्रकरणावरून खळबळ उडालेली आहे .

आमदार रवी राणा म्हणाले , ‘ आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना दूर करून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचाही हत्या केली जाण्याची शक्यता आहे ‘

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात एनआयएने मुंबई पोलिसांचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरत सरकारला बॅकफूटला ढकललं. एनआयएने वाझेंना अटक केल्यानंतरही विरोधक सत्तेत असलेल्या शिवसेनेवर टीका करणं थांबवत नाहीयेत. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनीही सचिन वाझे प्रकरणाची तार मातोश्रीशी जोडली जात असल्याचं म्हटलंय.

नवनीत राणा म्हणाल्या की, “ या प्रकरणात जे काही झालं आणि सचिन वाझेच्या सर्व तार या मातोश्रीशी जाऊन मिळत आहेत. मुंबई पोलीस कोणाच्या दबावाखाली होते? या प्रकरणाचा चांगला तपास का झाला नाही याची उत्तरं मिळायला हवीत. पोलीस चौकशीदरम्यान हिरेन यांना मेंटली टॉर्चर करण्यात आलं आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली. ज्याने ही हत्या केली त्यालाच प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. विरोधक जेव्हा वाझेंच्या निलंबनाची मागणी करत होते तेव्हा मुख्यमंत्री एकही शब्द बोलले नाहीत आणि त्यांनी वाझेला पाठींबा दिला. पण आता एनआयएने तपास हाती घेतल्यानंतर हे प्रकरण हळुहळु उलगडायला लागलं आहे.”

नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, ‘ सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला सर्व माहिती दिली तर मोठा विस्फोट होईल. या सगळ्यात महाराष्ट्र सरकार सामील नाही तर पोलीस आयुक्तांची बदली का करण्यात आली? एनआयएने वाझेंना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवावे. अन्यथा त्यांचाही मनसुख हिरेन होऊ शकतो, अशी भीती भाजप खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली.

कोण आहेत सचिन वाझे ?

नव्वदच्या दशकातील ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट‘ अशी ख्याती असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे जवळपास 16 वर्षांनंतर 2020 मध्ये पोलिस दलात परतले. मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता.

सचिन वाझेही या आरोपींपैकी एक होते. त्या प्रकरणात त्यांना 2004 मध्ये निलंबितही करण्यात आले होते. 2007 मध्ये त्यांनी राजीनामा दिला, मात्र तपास सुरु असल्याने तो मंजूर करण्यात आला नव्हता. त्यानंतर 2008 च्या दसरा मेळाव्यात ते शिवसेनेत दाखल झाले. काही चॅनेल्सवर ते शिवसेनेची भूमिका मांडताना देखील दिसले होते.

सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी 60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. प्रदीप शर्मा अंधेरी सीआययूचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात वाझे यांनी काम केलं आहे. सचिन वाझे यांच्यासह कॉन्स्टेबल राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम यांनाही पुन्हा सेवेत रुजू करण्यात आले आहे. सायबर क्राइम आणि बनावट नोटांशी संबंधित अनेक मोठी प्रकरणेही त्यांनी हाताळली आहेत. सॉफ्टवेअर डेवलपर म्हणूनही त्यांनी काम केलं. वाझेंनी एक अ‍ॅपही तयार केले होते. ते एका एनजीओ संबंधित कामही करायचे. गरजू लोकांना कायदेशीर मदत देणे हे या स्वयंसेवी संस्थेचे काम होते.


शेअर करा