नगर जिल्ह्यातील खरा कोरोना मृत्यूचा आकडा ‘ असा ‘ दडवला जातोय ? : सविस्तर बातमी

शेअर करा

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. भारतातील करोना परिस्थितीवर इतर देशांसह जागतिक आरोग्य संघटना लक्ष ठेवून आहेत. भारतात करोनामुळे होणारे बाधित आणि मृतांची संख्या चिंताजनक असून भारत सरकारने करोनाबाधितांची खरी आकडेवारी समोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे . भारत सरकार दाखवत असलेल्या आकड्यांवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . सरकारी आकडे आणि मृतांची संख्या यात ताळमेळ दिसत नसल्याचे निदान जमिनीवर तरी आढळून येत आहे.

नगर चौफेरने शहरात केलेल्या पाहणीत देखील सरकारी मृत्यूचा आकडा आणि प्रत्यक्षात असलेला आकडा यात देखील फरक असल्याचे आढळून आले आहे . जिल्हयात अचानकपणे घटलेली मृत्यूंची संख्या ही घटली कि घटवली गेली हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. कचरा डेपो येथील फक्त एकाच स्मशानभूमीत सरासरी रोज २५ पेक्षा जास्त अंत्यसंस्कार होत असून पूर्ण जिल्ह्यातील रोजचा एकूण मृत्यूचा आकडा देखील त्यादरम्यानच असल्याने जिल्हयातील इतर स्मशानभूमीत कोणतेही अंत्यसंस्कार केले जात नाहीत का ? हा एक प्रश्न उपस्थित झाला आहे .

कोरोनामुळे होणारे मृत्यू देखील बहुतांश प्रकरणात सरकारी नोंद लावताना कोरोनामुळे नव्हे तर न्यूमोनिया व इतर कारणांनी झाल्याचे दाखवण्यात येत आहे. पेशंट आजारी पडल्यानंतर खाजगी दवाखान्यात कोरोनाची चाचणी करतात आणि त्यानंतर काही कालावधीने जिल्हा रुग्णालयात दाखल होतात . खाजगी लॅबच्या रिपोर्टला जिल्हा रुग्णालयात फारसे महत्व न देता कोरोनाचे उपचार केले जातात मात्र मृत्यू होताच आमच्याकडे सदर रुग्णाला कोरोना होता याबाबत मात्र हात वर केले जातात. जर कोरोना नव्हता तर मृतदेह परिवाराच्या ताब्यात देण्यात अडचण काय ? याबद्दल देखील काहीही उत्तर देण्यात येत नाही . मयत रुग्णाच्या आधीच्या खाजगी लॅब रिपोर्टवर कोरोनाची नोंदणी आहे मात्र सरकार दरबारी मात्र त्यांची कोरोनामध्ये नोंद होत नसल्याने आकडेवारी अशा रीतीने घटवली की काय हा प्रश्न उपस्थित होत आहे .

कोरोना रुग्णाचा मृत्यू होताच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सर्व नियम कोरोनाचे लावले जातात मात्र कागदोपत्री नोंद मात्र कोरोनाची करण्यास टाळाटाळ केली जाते . उपचार आणि औषधे कोरोनाची मात्र नोंद न्यूमोनिया व इतर आजारांची असा देखील प्रकार सध्या जिल्ह्यात सुरु आहे . राज्य सरकारकडून स्वतःचे अपयश लपवण्यासाठी कोरोनाच्या आकडेवारीने मात्र नागरिकांमध्ये प्रश्चचिन्ह उपस्थित केले आहे .


शेअर करा