कोरोनाचा डेल्टानंतर आलाय ‘ हा ‘ नवीन व्हेरियंट , ३० पेक्षा जास्त देशात रुग्ण आढळले

शेअर करा

जगावर कोरोना महामारीचे संकट कायम आहे. कोरोना विषाणू सातत्याने आपलं रुप बदलत आहे. डेल्टा व्हेरियंटने चिंता वाढवली असतानाच कोरोनाचा नवीन प्रकार समोर आला असून ३० पेक्षा अधिक देशात त्याने उपस्थिती देखील लावलेली आहे . लॅमडा असे या व्हेरियंटचे नाव असून डेल्टा व्हेरियंटपेक्षा कोरोनाचा लॅमडा व्हॅरियंट अधिक धोकादायक आणि जीवघेणा असल्याचा दावा मलेशियाच्या आरोग्य विभागाने केला आहे. गेल्या काही दिवसांत जवळपास 30 पेक्षा अधिक देशांमध्ये लॅमडा व्हेरियंट आढळून आला आहे.

लॅमडा व्हेरियंटचा उगम पेरु देशामध्ये झाल्याची नोंद आहे. दक्षिण अमेरिकेतील या देशाचा कोरोना मृत्यूदर जगात सर्वाधिक आहे. लॅमडा व्हेरियंट यूकेमध्ये सुद्धा आढळून आला आहे. संशोधकांना चिंता आहे की हा व्हेरियंट डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे, ऑस्ट्रेलियातील एका न्यूज पोर्टमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. पेरु देशात आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी जवळपास 82 टक्के रुग्णांमध्ये लॅमडा व्हेरियंट आढळून आला होता. चिलीमध्ये एकूण रुग्णांपैकी 31 टक्के रुग्ण डेल्टा व्हेरियंटचे होते.

जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच लॅमडा व्हेरियंट धोकादायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. लॅमडा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आणि शरीरातील अँटिबोडीला चकमा देणारा असल्याचं सांगितलं जातं आहे. असे असले तरी यूकेतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार लॅमडा व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचा किंवा व्हेरियंटवर लस प्रभावी ठरत नसल्याचा कोणताही पुरावा नाही पण व्हेरियंटवर अभ्यास सुरु आहे.

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या आत नोंदली जात आहे. असे असले तरी देशातील डेल्टा व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांनी संख्या वाढू लागली आहे. शिवाय डेल्टा प्लसचा धोका कायम आहे. अद्यापतरी देशात लॅमडाचे रुग्ण आढळून आले नाहीत. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय.


शेअर करा