कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी आखाती देशातील दुबई येथून मुंबईत परतलेल्या तरुणीने क्वारंटाइन केलेल्या हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सहा मार्च रोजी घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून प्रियकर आणि त्याची पत्नी दोघांच्या विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अजून कोणाला अटक केलेली नाही.
उपलब्ध माहितीनुसार , मृत संजली सिंग तीन मार्चला दुबईवरून मुंबई विमानतळावर आली होती. त्यानंतर तिला काही दिवस साई लीला रेसिडेन्सी चकाला अंधेरी या हॉटेलमध्ये विलगीकरणासाठी ठेवण्यात आले होते. विलगीकरणासाठी ठेवलेले असतानाच तरुणीने 6 मार्च रोजी संध्याकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्येच गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
सदर आत्महत्येप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र याप्रकरणी संजलीची आई ज्योती सिंग यांनी आपल्या मुलीचा प्रियकर अमन सिंग वर्मा आणि त्याची पत्नी संगीता वर्मा या दोघांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. मृत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस आत्महेत्याला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे .
संजलीचे विवाहित असलेल्या अमन सिंग वर्मा सोबत प्रेमसंबंध होते. संजलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, अमन संजलीला आणण्यासाठी एअरपोर्टवरही गेला होता. संजली हॉटेलमध्ये असताना अमनच्या पत्नीने तिला फोन केला व भरपूर सुनावले. त्यावेळी अमन विवाहित असल्याचे संजलीला समजलं. त्यानंतर दोन दिवसांनी संजलीने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं.