पतीच्या हत्येच्या सुडासाठी पत्नीची तब्बल तीन वर्षे प्लॅनिंग, मास्टरप्लॅन पाहून पोलिसही हैराण

शेअर करा

एका महिलेने आपल्या पतीच्या खुनाचा सूड उगवण्यासाठी असा काही प्लान आखला, जो उघड झाल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले . तब्बल तीन वर्षं मेहनत करुन अखेर तिने आपली खूनी योजना अंमलात आणली. पाकिस्तानी दैनिक डॉनने याबद्दल वृत्त दिले असून घटना पाकिस्तानमधील आहे. महिलेचा कांगावा पाहून पोलिसांना तिचा संशय आला आणि ती जाळ्यात अडकली .

कबायली प्रदेशातील बाजौर जिल्ह्यात एका व्यक्तीचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. पण हा नैसर्गिक मृत्यू होता की त्याची हत्या करण्यात आली हे स्पष्ट झालं नव्हतं . सरकारी यंत्रणेत तपासात जास्त कालावधी होऊनही टाळाटाळ होत असल्याचे लक्षात येताच या महिलेने स्वतःच आपल्या पतीच्या मृत्यूबाबत तपास सुरू केला आणि तिला समजलं, की तिच्या पतीचा मित्र गुलिस्तान खान यानेच विषारी इंजेक्शनचा वापर करुन तिच्या पतीची हत्या केली आहे. त्यानंतर तिने गुलिस्तानचा काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि पाच-सहा महिन्यांपर्यंत गुलिस्तानला मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला यश आले नाही .

अगदी शेवटचे शस्र म्हणून तिने गुलिस्तानला प्रेमाचे आमिष दाखवत गुलिस्तानशी जवळीक साधण्याचा निर्णय घेतला. गुलिस्तानला अगोदरच एक पत्नी आणि एक मुलगा होता. मात्र, या महिलेने पैसे, गाडी अशा गोष्टींचं आमिष देऊन गुलिस्तानला आपल्या जाळ्यात अडकवलं. तिने गुलिस्तानला आपल्यासोबत लग्न करण्यासाठीही तयार करुन घेतलं आणि त्याच्याशी लग्नही केलं आणि लग्नानंतर गुलिस्तान आणि ही महिला एकाच घरात राहू लागले.

काही दिवसांनी गुलिस्तानला सुरक्षेच्या कारणास्तव एक पिस्तुलही खरेदी करण्यास भाग पाडलं. यानंतर एक दिवस रात्री गुलिस्तान झोपल्यानंतरही ही महिला जागीच होती. ती दुसऱ्या खोलीत गेली, जिथे पिस्तुल ठेवलं होतं. ते पिस्तुल घेऊन ती पुन्हा आपल्या खोलीत आली, आणि समोर पलंगावर झोपलेल्या गुलिस्तानवर तिने गोळी झाडली.पण बंदुकीतून गोळी बाहेरच आली नाही. त्यामुळे घाबरुन ही महिला दुसऱ्या खोलीत पळून गेली.

गुलिस्तान गाढ झोपेत असल्याने तो जागा झाला नाही याचा फायदा घेत ती पुन्हा एकदा आपल्या खोलीमध्ये आली आणि यावेळी मात्र तिने झाडलेल्या गोळीने गुलिस्तानचे आयुष्य संपवले. तिने पहिली गोळी गुलिस्तानच्या डोक्यात आणि दुसरी शरीराच्या उजव्या बाजूला मारली. यानंतर ती सकाळपर्यंत तिथेच बसून राहिली आणि सकाळ होताच तिने लोकांना सांगितलं की कोणीतरी गोळ्या झाडून आपल्या पतीची हत्या केली आहे मात्र तिचा हा कांगावा फार वेळ चालला नाही आणि तिला गजाआड व्हावे लागले.


शेअर करा