केंद्राकडून हेरगिरी ? तुमचाही मोबाईल पेगासस ‘ इतक्या ‘ सहज करू शकते हॅक

  • by

 2 total views

300 भारतीयांची केंद्र सरकारनेच जासूसी केल्याचा आरोप होतोय. यात 40 पेक्षा जास्त पत्रकार आहेत तर जजेस, उद्योगपती आणि निवडणूक आयोगाशी संबधित व्यक्तींची देखील हेरगिरी केल्याचं वृत्त एका न्यूज पोर्टलनं दिलेलं आहे. याच मुद्यावर आज संसदेत गदारोळ झाला. ह्या सगळ्या घटनाक्रमाच्या केंद्रस्थानी आहे ते इस्त्रायली सॉफ्टवेअर पेगासस मात्र हे सॉफ्टवेअर नेमकं कसं काम करतं हे जाणून घेऊया.

पेगासस हे एक इस्त्रायली सॉफ्टवेअर आहे. जासूसी करण्यासाठी त्याचा अनेक देशांनी वापर केल्याचं आता उघड होतंय. NSO ह्या इस्त्रायली कंपनीनं त्याला तयार केलय आणि ते फक्त सरकार किंवा सरकारी संस्थानाच वापर करण्यासाठी कंपनी विकते. याचाच अर्थ असा की सामान्य नागरिकांना वापरण्यासाठी ते उपलब्ध नाही. केवळ सरकार हे सॉफ्टवेअर विकत घेऊ शकते आणि दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी त्याचा वापर करू शकते मात्र भारतात मात्र या सॉफ्टवेअरचा वापर करून चक्क पत्रकार, विरोधी पक्षनेते तसेच निवडणूक आयोगाशी संबंधित व्यक्तींची हेरगिरी केल्याचा आरोप केंद्र सरकारवर केला जात आहे . सत्तेत टिकून राहण्यासाठी भाजपने सर्व मर्यादा ओलांडल्याचा आरोप भाजपवर केला जात आहे.

पेगासस काम कसं करतं ?

ज्याच्या फोनला हॅक करायचं असतं त्याच्यात पेगासस इन्स्टॉल करण्यासाठी हॅकर्स वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करतात. त्यातला एक मार्ग असाही आहे की, ज्या फोन यूजर्सला टार्गेट करायचं आहे त्याच्या फोनवर एक एक्स्प्लॉईट लिंक पाठवली जाते. जसही त्या लिंकवर यूजर क्लिक करतो आणि पेगासस आपोआप इन्स्टॉल होतं. एकदा का हे सॉफ्टवेअर इंस्टाल झालं की हे हेरगिरी करून तुमची अक्षरश: सगळी माहिती त्याच्या निर्माणकर्त्याला अथवा ज्याने सॉफ्टवेअरसाठी पैसे मोजले आहेत अशा सरकारला पाठवत राहते .

व्हॉटसअपमध्ये पेगासस कसं इन्स्टॉल होतं ?

2019 ला हॅकर्सनी व्हाटस अपचा वापर करुन फोनध्ये पेगासस इन्स्टॉल केलं होतं, त्यावेळेस एक वेगळीच पद्धत अवलंबली होती. त्यावेळेस हॅकर्सनी व्हॉटस अपच्या व्हीडीओ कॉल फिचरमध्ये एक उणीव अर्थात बग शोधून काढला आणि त्याचाच फायदा घेत हॅकर्सनी नकली व्हाटसअप अकाऊंटवरुन टार्गेटवर असलेल्या फोनवर व्हीडीओ कॉल केले. कॉलदरम्यान एका कोडद्वारे पेगाससला फोनमध्ये इन्स्टॉल केलं.

पेगासस नेमकी कोणती माहिती चोरतं ?

एकदा का पेगासस तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केलं तर हॅकर्स तुमच्या फोनला कमांड देऊ शकतात. तुमच्या फोनवर हॅकर्सचं नियंत्रण येतं. त्यातून त्यांना हवी ती माहिती ते मिळवू शकतात. त्यात तुमचा पासवर्ड नंबर, कॉनटॅक्ट नंबर, तुमचं लोकेशन, कॉल्स, मेसेज सगळं ते पाहू शकतात, ऐकू शकतात, वाचू शकतात. एवढच नाही तर तुमच्या फोनचा कॅमेरा, माईक यालाही हॅकर्स त्यांना वाटेल तेव्हा चालू करु शकतात. तुमचं रियल टाईम लोकेशन त्यांना सहज मिळू शकतं. थोडक्यात काय तर तुम्ही जसा तुमचा फोन वापरू शकता अगदी त्याच पद्धतीने त्रयस्थ व्यक्ती सर्व काही माहिती पाहून तुमच्या हातातील फोनचा वापर करू शकते आणि तुम्हाला समजतही नाही.

पेगासस एवढं फेमस का आहे?

पेगासस सारखी इतरही अनेक सॉफ्टवेअर आहेत मात्र जासूसीसाठी किंवा हेरगिरीसाठी पेगाससचाच वापर का ? तर त्याचं कारण आहे त्याची क्वालिटी.पेगासस एकदा इन्स्टॉल झालं तर फोनमध्ये तो स्वत:च्या कुठल्याच पाऊलखुणा सोडत नाही. इंस्टाल केलेल्या ऐपच्या लिस्टमध्ये तर सोडाच इतरही कुठेच त्याचे अस्तित्व जाणवत नाही मात्र सगळी माहिती त्रयस्थ व्यक्तीला पोहोच होत राहते .

दुसरी गोष्ट अशी की, हे सॉफ्टवेअर कमी बँडविथवर काम करु शकते तसेच त्यासाठी फोनची बॅटरीही फार खात नाही. कमी मेमरी वापरत असल्याने त्याचा संशय येत नाही आणि त्यातूनच मग फोन हॅक होतोय हेच कळत नाही. अँड्रॉईडच्या तुलनेत जास्त सुरक्षित मानला जातो आयफोनचा iOS लाही पेगासस हॅक करु शकतो. तुम्ही फोन जरी लॉक केला तरी पेगाससवर त्याचा फरक पडत नाही आणि तो आपलं काम करत रहातो.