नगरमध्ये पोलिसांच्या गाडीतून ओढून आरोपीवर प्राणघातक हल्ला ? : जाणून घ्या पूर्ण प्रकरण

शेअर करा

नगर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून चक्क पोलिसांची गाडी अडवून आरोपीस बाहेर काढून मारहाण करण्यात आल्याचा आरोप परिवाराकडून कारणात आला असून आरोपीची प्रकृती गंभीर असल्याचे परिवाराकडून सांगण्यात आले आहे . पोलिसांनी आरोपीस वाचवण्याऐवजी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा देखील धक्कादायक आरोप पोलिसांवर करण्यात आलेला आहे . प्राथमिक माहितीनुसार दोन टोळ्यांच्या मधील हा वाद असून भिंगार नाला परिसरात हा प्रकार रविवारी रात्री घडलेला आहे .

सादिक लाडलेसाहब बिराजदार (वय ३२ रा. मुकुंदनगर) असे या घटनेत जखमी झालेल्या आरोपीचे नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असून त्यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी सादिक याच्या कुटुंबियांनी केली आहे. एका गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला पोलिस अटक करून घेऊन जात असताना हा प्रकार घडला आहे .

रविवारी रात्री भिंगार नाल्याजनिक ही घटना घडली. सादिक लाडलेसाहब बिराजदार हा एका कौटुंबिक स्वरूपाच्या गुन्ह्यात आरोपी असल्याने पोलीस त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेऊन जात असताना मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद याने साथिदारांसह पोलिसांचा पाठलाग करून पोलिसांचे वाहन अडवले आणि सादिकला वाहनातून बाहेर काढले आणि बेदम मारहाण केली , असे परिवाराचे म्हणणे आहे.

सादिक याची पत्नी रुक्सार बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद, रशीद रसुल सय्यद, कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद सर्व रा. दर्गादायरा (रा. दर्गादायरा, मुकुंदनगर) यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे रुक्सार बिराजदार यांची तक्रार ?

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सादिक विरूद्ध गुन्हा दाखल असल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी पोलीस रविवारी रात्री साडेसात वाजता पोलीस घरी आले आणि आणि त्याला घेऊन पोलिस बाहेर पडले. त्यावेळी घराच्या बाहेर मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद थांबला होता. पोलिस निघताच त्याने कोणाला तरी फोन केला आणि काठ्या लाठ्यांसह ताबडतोब या असा निरोप दिला. पोलिस सादिकला घेऊन गेल्यानंतर आम्ही पोलिसांच्या मागे पोलीस स्टेशनकडे निघालो होतो मात्र वाटेतच भिंगार नाल्याजवळ पोलिसांचे वाहन थांबलेले दिसले. त्याच्याशेजारी एक रिक्षाही उभी होती आणि तेथून काही अंतरावर आरोपी सादिक याला लोखंडी रॉडने मारहाण करीत होत मात्र आम्ही जवळ जाईपर्यंत पोलिस त्याला पुन्हा गाडीत बसवून घेऊन गेले.

आम्ही सादिक याच्या मोबाईलवर फोन केला तर तो एका पोलिसाने घेतला व सादिकचा अपघात झाला असून त्याला जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानुसार आम्ही जिल्हा रुग्णालयात गेलो. तेथे त्याची तपासणी करून डोक्याला मार लागल्याने अन्य रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले. यानुसार त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भिंगार पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांच्या ताब्यात असूनही आरोपीला मारहाण झाल्याने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले जात आहे. तर सादिकच्या कुटुंबियांनी पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली असून आता पोलीस हे प्रकरण कसे हाताळतात ते पाहावे लागेल


शेअर करा