‘ सर पूजा बोलतेय बजाज फायनान्समधून ..’, अन त्यानंतर सुरु व्हायचा असा खेळ ?

शेअर करा

देशात कोरोनानंतर सायबर गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विविध प्रकारचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांना आतापर्यंत चुना लावण्यात आलेला आहे मात्र तरीदेखील नागरिक अशा व्यक्तींच्या अमिषाला बळी पडतात. अशीच एक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. कमी व्याजाच्या बदल्यात मोठ्या रक्कमेचं कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या बहाण्यानं फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यातील मास्टरमाइंड महिला ५३ वर्षाची असून पोलिसांनी तिला गजाआड केले आहे .

पूजा सिंग असं अटक केलेल्या 53 वर्षीय महिलेचं नाव असून ती हरियाणातील हिसार जिल्ह्यातील लाडवा गावातील रहिवासी आहे. सदर महिला देशातील विविध भागातील नागरिकांना फोनवरून संपर्क साधून त्यांना कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देण्याचं आमिष दाखवत. ‘आपण बजाज फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचं भासवून तुम्हाला कमी व्याजदरात दीर्घ मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, अशी थाप मारायची . आर्थिक अडचणीत असलेले व्यावसायिक आणि नागरिक साहजिकच तिच्या या जाळ्यात अडकायचे अन फसायचे.

आरोपी पूजा सिंग हिने आपल्या काही साथीदारांच्या मदतीनं देशातील शेकडो लोकांना गंडा घातला आहे मात्र बहुतांश लोकांनी पैसे सोडून दिल्याने तिचे फावत होते. सध्या पोलिसांनी सध्या पूजा सिंगला अटक केली असून तिच्या अन्य साथीदारांची ओळख पटवण्याचं आणि त्यांना जेरबंद करण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत . नागपूरातील रेल्वे विभागात कार्यरत असणाऱ्या देवानंद अनिल शेंडे यांनी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

काय आहे प्रकरण ?

आरोपी पूजानं फिर्यादी शेंडे यांना फोन केला आणि आपण बजाज फायनान्समधून बोलत असल्याचं भासवून दहा वर्षांसाठी 6.9 टक्के व्याजदरानं 8 लाखांचं कर्ज उपलब्ध करुन देऊ शकतो, असं सांगितलं. सुरुवातीला शेंडे यांनी नकार दिला मात्र तिने अनेक वेळा फोन करून शेंडे यांना आपल्या कौशल्याने कर्ज घेण्यास राजी केले. त्यानंतर आरोपींनी शेंडे यांची कागदपत्रेही जमा करून घेतली आणि कर्ज मंजूर करण्याच्या नावाखाली विविध कारणं देत शेंडे यांना 28 हजार रुपयांना गंडा घातला मात्र सतत होत असलेली टाळाटाळ पाहून शेंडे यांना संशय आला आणि त्यांनी आपल्याला कर्ज नको असल्याचं सांगत आरोपींकडे पैसे परत मागितले.

पैसे परत मागितले खरे मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. आरोपी पूजानं आणि तिचे साथीदार विकास जैन, दीपक चव्हाण, संजीव कुमार, ओमप्रकाश यांनी शेंडे यांचा फोन स्वीकारणं बंद केलं. काही कालावधीने आरोपींनी आपला फोनही स्वीच ऑफ केला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच शेंडे यांनी अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी महिलेचा पत्ता शोधून काढत तिला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


शेअर करा