पुणे हादरलं..तलाठी पतीने पत्नीची केली हत्या अन म्हणाला ‘ मला माफ करा ती …. ‘

शेअर करा

पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी परिसरात एका तलाठी पतीनं आपल्या डॉक्टर पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीनं आपल्या पत्नीवर आधी चाकूनं हल्ला केला आणि त्यानंतर हातोडीनं डोक्यात जबरी वार करत तिची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर घटनास्थळी चिठ्ठी लिहून तलाठी पती फरार झाला असून एमआयडीसी भोसरी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, सरला विजयकुमार साळवे असं खून झालेल्या 32 वर्षीय महिलेचं नाव आहे तर विजयकुमार साळवे असं 35 वर्षीय आरोपी पतीचे नाव असल्याचे समजते. मृत सरला या पुण्यातील नायडू रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या तर आरोपी पती विजयकुमार हा जुन्नर तालुक्यातील आळेगाव याठिकाणी तलाठी म्हणून काम करत होता. मृत सरला आणि विजय यांचा 2019 मध्ये प्रेम विवाह झाला होता मात्र पती कायम सरला हिच्यावर संशय घेत असल्याने त्याची भांडणे होत होती .

काही महिन्यांपूर्वी दोघांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी याठिकाणी एक फ्लॅट विकत घेतला होता आणि शनिवारी 4 सप्टेंबर रोजी या नवीन फ्लॅटची वास्तूशांती देखील करण्यात आली होती. पूजा झाल्यानंतर सरला आणि विजयकुमार हे दोघंही तिथेच मुक्कामी थांबले होते आणि याच ठिकाणी विजयकुमारनं आपल्या पत्नीवर चाकूने वार केले आणि त्यानंतर डोक्यात हातोडी मारून त्यांची निर्घृण हत्या केली.

दुसऱ्या दिवशी दोघांचेही मोबाइल बंद असल्याचं नातेवाईक आणि मित्रांच्या निदर्शनास आलं त्यानंतर साळवे यांच्या मित्रांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात याची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तर घराला बाहेरून कुलूप लावल्याचं पोलिसांना दिसलं. पोलिसांनी चावीवाल्याकडून चावी तयार करून घरात प्रवेश केला असता सरला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. पोलिसांनी सरला यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीचं मृत घोषित केले .

पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी देखील आढळून आली आहे. ‘ ती मला साथ देत नव्हती. त्यामुळे मला टोकाची भूमिका घ्यावी लागली. मला माफ करा’, अशा आशयाचा मजकूर लिहिला होता. आरोपी विजयकुमार याला डॉ. सरला यांच्यावर चारित्र्याचा संशय होता. यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


शेअर करा