डोंबिवली हादरली..अल्पवयीन मुलीवर ३३ जणांकडून तब्बल ‘ इतके ‘ महिने सुरु होते अत्याचार..

शेअर करा

पुणे, मुंबईतील बलात्काराच्या अमानुष घटनांनी महाराष्ट्राची बदनामी झालेली असतानाच आणखी एक धक्कादायक घटना डोंबिवली इथे उघडकीस आली असून डोंबिवलीतील १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल ३३ नराधमांनी नऊ महिन्याच्या काळात आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची ही घटना आहे .

सातत्याने होत असलेल्या या त्रासाला वैतागून मुलीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी २३ आरोपींना अटक केली. दोघे आरोपी अल्पवयीन असून उर्वरित आरोपी २० ते ३० वयोगटातील आहेत. काही आरोपी राजकीय पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याची देखील माहिती समोर आल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण देखील लागले आहे .

उपलब्ध वृत्तानुसार, पीडित मुलगी ही डोंबिवली ग्रामीण भागात राहते. तिच्या प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवीत जानेवारीत तिच्यावर बलात्कार केला. त्या शरीरसंबंधांचा व्हिडीओ त्याने काढला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकर व त्याच्या मित्रांनी २९ जानेवारी ते २२ सप्टेंबर या काळात पीडितेवर डोंबिवली, बदलापूर, रबाळे, मुरबाड येथे वेगवेगळ्या ठिकाणी नेत सामूहिक बलात्कार केला.काही आरोपी तक्रार दाखल झाल्याचे समजताच फरार झाले आहेत.

पीडित मुलीची आरोपींपैकी दोन तरुणांशी मैत्री होती. यातील एक तिचा प्रियकर असून त्याने लग्नाचे आमिष दाखवीत तिच्यावर बलात्कार केला. या वेळी काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने व त्याच्या मित्राने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दोघांनी संबंधित व्हिडीओच्या आधारे त्या मुलीस धमकावून वेगवेगळ्या ठिकाणी अन्य मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या नावाखाली तिला बोलावून बलात्कार करण्याकरिता इतर मित्रांच्या हवाली केले आणि त्यानंतर तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेऊन घटनेचा तपास स्थानिक पोलीस अधिकाऱ्याकडे न सोपवता ठाणे विभागाच्या महिला सहायक पोलीस आयुक्त सोनाली ढोले यांच्याकडे तपास सुपूर्त करण्यात आला आहे तर पीडित मुलीला कळवा येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. आरोपींवर बलात्कारासह पोक्सोअंतर्गत मानपाडा पोलीस ठाणे इथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे .


शेअर करा