
प्रेमविवाहामध्ये एक नातेवाईक सातत्याने अडथळे आणत होता. त्याला चांगलाच धडा शिकवायच्या उद्देशाने त्याने पूर्ण प्लॅन केला मात्र अतिहुशारी नडली आणि तो प्लॅन त्याच्याच अंगलट आला. आधी त्याने प्रेमविवाहामध्ये अडथळे आणणाऱ्या नातेवाईकाच्या गाडीमध्ये गावठी कट्टा ठेवला, त्यानंतर त्याची खबर पोलिसांना दिली. मात्र घडले असे काही की, नातेवाईक सोडून तोच ह्या प्रकरणात अडकला. नगर जिल्ह्यातील जखणगाव ( ता. नगर ) इथे ही घटना घडली असून मुजीब नवाब शेख याला गजाआड करण्यात आले आहे .
नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंह राजपूत यांना एका व्यक्तीने माहिती दिली की, जखनगावाकडून नगरकडे येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या एका चारचाकी गाडीत (क्र.एम १७ एझेड ८७५१) गावठी बनावटीचे पिस्तुल घेवून एक व्यक्ती येत आहे.राजपूत यांनी पूर्ण सूत्रे फिरवून त्या चालकास पकडण्यासाठी फिल्डिंग लावली. पोलीस पथक निमगाव वाघा फाट्यावर जाऊन थांबले .
थोड्या वेळातच त्यांना खबऱ्याने दिलेल्या माहितीप्रमाणे पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी येताना दिसली, गाडी क्रमांकाची खात्री करुन गाडी थांबवून चालकास पोलिसांनी थांबवले मात्र त्याला गावठी पिस्तुल बाबत काहीच माहिती नव्हते. पोलिसांनी गाडीची झडती घेतली मात्र त्यांना देखील तिथे काही आढळून आले नाही. एव्हाना चालकाला यातील खरोखरच काही माहिती नाही अशी पोलिसांची देखील खात्री झाली.
इतक्यात तिथे मुजीब नवाब शेख आला, पोलिसांना मदत करत असल्याचे तो दर्शवत होता. इकडे पहा तिकडे पहा असे करताना तो पोलिसांना जरा जास्तच सांगू लागला त्यावरून पोलिसांचा त्याच्यावरच संशय बळावला. मग पुढे होत त्याने गाडीच्या मागील बाजूचे सीट व काच यांच्यामधून एक गावठी पिस्तुल काढून दिले. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडी चालकासोबतच पिस्तुल काढून देणाऱ्या खबरीला देखील पोलीस ठाण्यात आणले
पोलीस ठाण्यात आल्यावर मुजीब शेख याची सखोल चौकशी केली असताना त्यानेच हा उपद्याप घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. गाडीचा मालक माझा नातेवाईक असून तो माझ्या प्रेमविवाहामध्ये अडथळे आणत होता .तसेच त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली होती . त्यामुळे गाडी मालकास अडचणीत आणण्याच्या उद्देशाने मी पोलिसांची दिशाभूल करून हे पिस्तुल गाडीत ठेवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सापडलेल्या पिस्तुलचा परवाना मुजीब शेख याच्याकडे नसल्याचेही चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी हे पिस्तुल जप्त केले असून मुजीब नवाब शेख याच्या विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला गजाआड केले आहे.
पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शंकरसिंग राजपूत व त्यांच्या पथकातील रितेश राऊत, बापूसाहेब फोलाने, संभाजी डेरे, राहुल शिंदे, ज्ञानेश्वर खिळे यांनी केली आहे.