‘ रानडुकरे मारण्याची परवानगी द्या ‘ , केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांचे धक्कादायक उत्तर

महाराष्ट्रातील विविध खेड्यांमध्ये सध्या रानडुकरांचा उपद्रव चांगलाच वाढलेला पाहायला मिळत आहे. खाण्यापेक्षा नुकसान जास्त करत ही रानडुकरे अक्षरशः शेतकऱ्याच्या पिकाची वाट लावून जातात. रानडुक्करामुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन त्याला अपायकारक प्राणी म्हणून घोषित करण्याची केरळ सरकारची विनंती केंद्र सरकारने मात्र फेटाळली आहे. रानडुकरांच्या शिकारीची परवानगी दिल्यास फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होईल, असे देखील मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

केरळचे वनमंत्री ससेंद्रन यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची सदर प्रकरणी दिल्ली येथे भेट घेतली होती, त्यावेळी जंगला शेजारील खेड्यांमध्ये रानडुकरांचा उपद्रव वाढला असल्याचे त्यांनी मंत्रीमहोदयांच्या कानी घातले मात्र मंत्री भूपेंद्र यादव यांनी नागरिकांना रानडुकराच्या शिकारीची परवानगी दिल्यास फायद्यापेक्षा नुकसानच जास्त होईल, असे उत्तर देण्यात आले.

केरळमध्ये देखील रान डुकरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने रानडुक्कराला उपद्रवी वन्य प्राणी म्हणून घोषित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. रानडुकरांची संख्या वेगाने वाढत आहे आणि त्यातून आधीच हतबल असलेला शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात देखील सापडत आहे त्यामुळे त्याला मारण्यास परवानगी देण्यात यावी म्हणून केरळच्या वनमंत्र्यांनी पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली होती.