नगरमध्ये भुयारी गटार अन गुलमोहर रोडचे काम आता ‘ ह्या ‘ कारणाने बंद

शेअर करा

नगर महापालिकेच्या अडचणींचा तिढा काही सुटायला तयार नाही अर्थात यामागे महापालिकेतील कथित टक्केवारी आणि ठेकेदारांची केली जात असलेली अडवणूक ही देखील एक मोठी अडचण बनून राहिलेली आहे. सद्यपरिस्थितीत महापालिकेतील ठेकेदार संघटनांचे आंदोलन सुरूच असून भुयारी गटार व गुलमोहर रस्त्याचे काम हाती घेतलेल्या ठेकेदारांनी मंगळवार पासून काम बंद केले आहे. नगरकरांना वेठीस धरण्याचा आमचा हेतू नाही ही मात्र आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचे ठेकेदार संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

महापालिकेतील नोंदणीकृत ठेकेदारांच्या संघटनेने विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे, मात्र महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याचा दावा करत अनेक वर्षांपासून या ठेकेदारांची बिले महापालिकेने दिलेली नाही. आर्थिक जुळवणूक करून ठेकेदार महापालिकेची कामे करून घेतात मात्र त्यानंतर आपली बिले मिळवण्यासाठी अनेकदा महापालिका अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागतात, त्यात अधिकारी वर्गाची असलेली कथित टक्केवारी दिल्याशिवाय पैसे हातात येत नाहीत ही ठेकेदारांची व्यथा आहे .

ठेकेदारांनी प्रत्येकी दोन लाख रुपये तरी देण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी देखील प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते दिले गेले नाही त्यामुळे ठेकेदार संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहे. महापौर रोहिणी शेंडगे यांनी याबाबत प्रशासनाला आदेश दिले होते मात्र प्रशासनाने अद्याप देखील ठेकेदारांची देयके दिलेली नाही, त्यामुळे येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिलेला आहे.

अनामत रक्कम परत देण्याचे अधिकार पूर्वी शहर अभियंत्यांना असायचे त्यामुळे ठेकेदारांना तात्काळ पैसे मिळत होते मात्र हे अधिकार आता आयुक्तांनी उपायुक्तांना दिलेले आहे त्यामुळे ही रक्कम मिळण्यास विलंब होत असून सदर अधिकार पुन्हा शहर अभियंता यांच्याकडे द्यावे, अशी ठेकेदारांची मागणी आहे . आहे. ठेकेदारांच्या आंदोलनाकडे महापालिकेने नेहमीप्रमाणे गांभीर्याने पाहिलेले अद्यापही दिसून येत नाही मात्र त्यामुळे अर्धवट झालेल्या कामामुळे नगरकरांचे मात्र प्रचंड हाल होत आहे.


शेअर करा