धक्कादायक..राहुरीच्या जेलमधून गज कापून मोक्काचे आरोपी फरार मात्र त्यानंतर

शेअर करा

नगर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात देखील धुमाकूळ घालणाऱ्या मोक्काच्या गुन्ह्यात अटक असलेल्या गुन्हेगारासह पाच जणांनी जेलच्या खिडकीचे गज कापून राहुरी जेलमधून पळ काढला आहे . फरार झालेल्या पाच आरोपींपैकी तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे तर उर्वरित दोन आरोपी मात्र अद्यापही फरार आहेत.

सागर भांड ( वय 25 राहणार ढवण वस्ती अहमदनगर ), किरण आजबे ( वय 26 राहणार भिंगार ) या दोन आरोपींना राहुरी येथून ताब्यात घेण्यात आले तर जालिंदर सगळगिळे ( वय 25 राहणार टाकळीमिया तालुका राहुरी ) याला मनमाड येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यासोबत पळालेले रवी पोपट लोंढे व नितीन मच्छिंद्र माळी हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. सागर भांड, रवी लोंढे आणि नितीन माळी हे मोकाच्या गुन्ह्यातील आरोपी आहेत.

नगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये दरोडा टाकणाऱ्या सागर भांडण टोळीतील आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले होते. वैद्यकीय शिक्षण घेत असलेला आरोपी सागर भांड आणि त्याच्या टोळीकडून अनेक ठिकाणी दरोडे, चोरी, दहशत निर्माण करणे, गावठी कट्टे यांचा वापर करून सर्वसामान्यांना जेरीस आणणे या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांना पकडून कारवाई केली होती आणि त्यानंतर या आरोपींना राहुरी पोलिस ठाण्यातील तुरुंगात ठेवण्यात आले होते.

शुक्रवारी मध्यरात्री भांड टोळीतील आरोपींनी पळून जाण्याचा बेत आखला आणि आणि जेलमधील पाठीमागील बाजूला असलेल्या खिडकीचे गज कापून रात्रीतून जेलमधून पळ काढला.पाच जण लपून पळत असल्याचे रात्री गस्त घालत असलेल्या पोलिसांच्या लक्षात आले त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक तुषार धाकराव, पोलीस हवालदार आदिनाथ पाखरे, सचिन ताजणे, दीपक फुंदे, विकास साळवे, देविदास कोकाटे आदींनी त्याचा पाठलाग सुरू केला आणि पळून गेलेल्या पाच पैकी तीन जणांना पुन्हा पकडण्यात आले.

राहुरी येथील ब्रिटीशकालीन कारागृहाची सुरक्षित तटबंदी भेदून एकाच वेळी पाच कैद्यांनी पलायन करण्याची ही पहिलीच घटना आहे. राहुरीची 5 व स्थानिक गुन्हे शाखेचे दोन अशी सात पोलिस पथके पसार झालेल्या दोन कैद्यांचा शोध घेत आहेत. सागर भांड याचे वडील विशेष म्हणजे पुणे पोलिस दलामध्ये कार्यरत होते. सागर भांडटोळीवर नगर आणि पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्ह्यांची नोंद असून मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला जेरबंद केले होते मात्र पळून जाण्याचा त्याचा प्रयत्न फसला असून त्याची रवानगी पुन्हा पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.


शेअर करा