‘ ..तेव्हा हा माणूस घरी गेला नाही ‘, निलेश लंके यांच्याबद्दल शरद पवार म्हणाले की ?

शेअर करा

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोनाच्या संकट काळात अनेक नागरिकांना आधार दिला आणि त्यांची संकटे दूर केली. त्यांच्या या कार्यामुळे निलेश लंके यांची आज देशभर ओळख झालेली आहे,अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार निलेश लंके यांचे कौतुक केले आहे. निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शरद पवार बोलत होते.

शरद पवार पुढे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी देशात कोरोनाचे संकट आले होते. लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. लोकांची रोजीरोटी बुडाली आणि हजारो लोक मृत्युमुखी पडले अशा वेळी पारनेरचे आमदार हे घरी बसून राहिले नाहीत तर रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था केली. स्वतःचा पगार देखील त्यांनी त्यासाठी खर्च केला आणि लोकांच्या मदतीचे योग्य नियोजन केले. कोरोनाच्या संकटात देखील हा माणूस घरी गेला नाही .

आमदार निलेश लंके यांनी देखील यावेळी बोलताना, ‘ आपण आपल्या वाढदिवसानिमित्त यापुढे देखील समाज उपयोगी कामे करू असे सांगत लोकांची आर्थिक स्थिती नाजूक झाल्याने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यकर्त्यांनी यासाठी मोठे परिश्रम घेतले, असे म्हटले आहे तर कार्यक्रमाच्या वेळी सुमारे 800 विद्यार्थ्यांना सायकलींचे देखील वितरण करण्यात आले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, मारुती रेपाळे, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, बाबाजी तरटे, बाळासाहेब कावरे, कैलास गाडीलकर यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.


शेअर करा