‘ महागाईविषयी मोदींना विचारलं तर ते म्हणतील थाली बजाओ ‘

शेअर करा

रशिया-युक्रेन युद्धामुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झालेली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैसे प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. आजपासून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार असून आधीचा विक्रम देखील मोडण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरांना आग लागलेली असताना दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढविल्यानंतर आज सामान्यांवर आणखी एक महागाईचा आगडोंब कोसळला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इंधन दरवाढ आणि महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरवरुन जोरदार निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींवर लागलेला ‘लॉकडाऊन’ हटवला आहे. आता सरकार सातत्याने किमतींचा विकास करेल. महागाईविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारलं, तर ते म्हणतील ‘थाली बजाओ’!” असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

इंडियन ऑईलनुसार घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपये प्रति सिलिंडर दरवाढ झाली आहे. या नव्या किंमती आजपासूनच लागू होणार आहेत. ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलिंडवर करण्य़ात आली आहे. यामुळे आजपासून या सिलिंडरच्या किंमती 949.50 प्रति सिलिंडर असणार आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतीत भलेही 137 दिवसांपासून वाढ झालेली नसेल, पण ठोक खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. यात अचानकपणे थेट 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता दिल्लीत ठोक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना डिझेल 115 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.


शेअर करा