नगर जिल्ह्यात सावकारीचा सुळसुळाट , मार्च एंडचे कारण दाखवून वस्तू उचलण्यापर्यंत मजल

शेअर करा

नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध सावकार यांचे पेव फुटलेले आहे. मनमानी पद्धतीने व्याज आकारणी, सुलतानी पद्धतीने वसुली यामुळे अनेक गोरगरीब हैराण झालेले असून याप्रकरणी सावकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या मार्च एंड असल्यामुळे पतसंस्था, बँका आणि सेवा वसुली पथके परत वसुलीसाठी फिरत आहे मात्र खाजगी सावकारदेखील मार्च यांच्या नावाखाली दमदाटी करत वसुली करत आहेत. पैसे नसतील तर व्याजाच्या नावाखाली वस्तू जप्त करण्याचा देखील त्यांनी सपाटा लावला असून गोरगरीब नागरिकांच्या घरातील वस्तू बेकायदा पद्धतीने सावकार ओढून नेत आहेत.

नगर जिल्हा ग्रामीण पातळीवर असे बहुतांश खाजगी सावकार असून त्यांच्या गुंडगिरीला नागरिक वैतागले आहेत. सुरूवातीला गरजवंत नागरिकांना आमिष दाखवत आर्थिक मदत करायची आणि त्यानंतर मनमानी पद्धतीने सावकारी व्याजाची आकारणी करायची अशा पद्धतीने नागरिकांचे शोषण सुरू आहे. सहाय्यक निबंधक कार्यालय आणि पोलिस यंत्रणा हतबल झालेली पाहायला मिळत असून त्यामुळे ही सावकारी आता खेड्यापाड्यात वाड्यावस्तीवर पोहचली आहे.

मागील दोन वर्षांपासून आधी कोरोना आणि लॉकडाऊन याने नागरिकांचे अर्थचक्र पूर्णपणे बिघडून गेले. हातावर पोट असलेल्या नागरिकांचे तर प्रचंड हाल झाले आणि त्यातून आर्थिक दिलासा मिळावा असे काहीही घडले नाही म्हणून नागरिकांना सावकाराच्या समोर हात पसरण्याची वेळ आली आणि सावकाराच्या पाशात अनेक नागरिक अडकले आहेत.

खाजगी सावकारांनी देखील या संधीचा पुरेपूर फायदा घेत तब्बल दहा हजार रुपयांसाठी तब्बल दोन हजार रुपये आठवड्याला व्याज अशा पद्धतीने आकारणी करून पैसे दिले नाहीत तर दमदाटी करून घरातल्या वस्तू उचलण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. ग्रामीण पातळीवर नागरिकांचे जीवन असह्य झालेले असून प्रशासनाला देखील गोरगरीब जनतेच्या या अडचणीची दखल घ्यावीशी वाटलेली नाही हे दुर्दैवी आहे.

सावकारी पाशाला वैतागून अनेकदा आत्महत्या देखील घटना घडलेल्या आहेत मात्र त्यानंतर जुजबी स्वरूपाची कारवाई केली जाते. अनेकदा घरातील माणूसच गेलाय आता सावकाराशी भांडून काय फायदा ? अशी भूमिका घेत पीडित परिवार देखील प्रकरण जास्त ताणत नाही आणि सावकार दुसरे सावज शोधायला मोकळे होतात असे आतापर्यंत दिसून येत आहे.


शेअर करा