शेतकऱ्यांचे कैवारी आणि जाणते राजे ‘ ह्या ‘ विषयावर गप्प का ? : राधाकृष्ण विखे यांचा सवाल

शेअर करा

राज्यातील दूध उत्पादकांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांची आंदोलनेही सुरू आहेत. मात्र, आपसांतील रुसवे फुगवे काढण्यात दंग असलेल्या महाविकास आघाडी सरकारला याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. सरकारमध्ये सहभागी असलेले ‘शेतकऱ्यांचे कैवारी’ आणि ‘जाणते राजे’ ही यावर काहीच का बोलत नाहीत,’ असा सवाल भाजप नेते व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना केलेला आहे.

गेल्या महिन्यापासून दुधाला वाढीव दर मिळावा, यासाठी आंदोलने सुरू आहेत. विविध शेतकरी संघटनांतर्फे आंदोलन सुरू असताना भाजपनेही यात उडी घेतलेली आहे ..संगमनेर तालुक्यातील मनोली येथील एका दूध संस्थेच्या इमारतीचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी दूध दराचा प्रश्न उपस्थित करून सरकारवर टीका केली.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, ” दूध दराचा विषय घेवून काही शेतकरी संघटना रोज सरकारला आंदोलनाचे इशारे देतात, पण त्यांचे आंदोलन कुठे दिसत नाही. उसाच्या भावासाठी आंदोलन करणारे शेतकरी संघटनेचे नेते दूध उत्पादकांच्या प्रश्नावर आक्रमक नाहीत. अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांना प्रति लिटर १० रूपये अनुदान द्या, अशी मागणी आम्ही करीत आहोत. दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले, पण सरकारने याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केले आहे. आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांचेच दूधसंघ आहेत. त्यामुळे दर वाढवून देण्यासाठी त्यांचाच विरोध असल्याचे आता लपून राहीले नाही”

” दूध उत्पादकांचे प्रश्न समजून घ्यायला सरकार मधील मंत्र्यांना वेळच नाही. त्यांचा संपूर्ण वेळ एकमेकांची समजूत काढून सरकार वाचविण्यासाठी चालाला आहे. एकाची समजूत काढली की दुसरा दूर जातो. ‘तुझ्या गळा माझ्या गळा’ असा कारभार सध्या सरकारचा सुरू आहे. कोणत्याही माळा गुंफा पण दूध उत्पादकांना न्याय द्या. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे जाणते राजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गप्प बसण्याची भूमिका कशी घेवू शकतातॽ’ असा सवाल देखील विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.


शेअर करा