औरंगाबाद नगर रोडवर भरदिवसा ‘ ऑनर किलिंग ‘ , आरोपी ताब्यात

शेअर करा

देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी जातीचे भूत हे नागरिकांच्या मानगुटीवरून उतरलेले दिसून येत नाही . महाराष्ट्र हादरवणारी एक घटना औरंगाबाद जिल्ह्यात समोर आली असून बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग तसेच विवाह करूनही तिला त्रास देत असल्याने तरुणीच्या भावाने त्याच्या दाजीचा कुर्‍हाडीने सपासप वार करून खून केलेला आहे. 29 तारखेला संध्याकाळी पाचच्या सुमारास औरंगाबाद नगर रोडवर ईसारवाडी फाटा येथे ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बाबासाहेब छबुराव खिल्लारे ( वय 31 राहणार भोकर तालुका श्रीरामपूर ) असे मयत व्यक्तीचे नाव असून आरोपी सचिन शामराव नाटकर ( राहणार भोकर ) याने हा खून केलेला आहे. खून केल्यानंतर त्याने नगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथे भोकर परिसरात पलायन केले होते मात्र पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून काढत त्याला उसाच्या फडातून बेड्या ठोकल्या आहेत.

बाबासाहेब याने पाच वर्षांपूर्वी सचिन याची बहीण असलेली हीना हिच्यासोबत आंतरजातीय विवाह केलेला होता तेव्हापासून सचिन याच्या डोक्यात बाबासाहेब याचा बदला घ्यायचे कारस्थान शिजत होते. बाबासाहेब हा त्याच्या पत्नीला घेऊन प्रवरासंगम येथे राहायला गेला होता त्यानंतर त्यांना एक मुलगा देखील झाला मात्र तो दगावला आणि त्यानंतर त्यांच्यात भांडणे सुरू झाली. बाबासाहेब याला सोडून हिना पुन्हा माहेरी निघून आली त्यामुळे सचिन यांच्या घरात देखील भांडणे सुरू झाली होती . बाबासाहेब हा त्याचा भाऊ नंदू याला भेटण्यासाठी आलेला असताना सचिन याने त्याच्यावर पाळत ठेवली होती.

सारंगपूर येथे बाबासाहेब आला याची कुणकुण लागताच सचिन गुरुवारी संध्याकाळी चारच्या सुमारास सारंगपूर परिसरात असलेल्या ईसारवाडी फाट्यावर आला. तिथे बाबासाहेब हा त्याचा भाऊ नंदू आणि त्याची वहिनी शोभा हे हुरडा विक्री करताना त्याला आढळून आले. सचिन याने काही वेळ त्यांच्यावर पाळत ठेवली आणि बाबासाहेब हा चहा पिण्यासाठी ईसारवाडी फाट्यावर गेला त्यावेळी सचिनने रस्त्यावरच त्याच्यावर कुऱ्हाडीने घाव घातले. त्यात बाबासाहेब गंभीर जखमी होऊन रस्त्यावर निपचित पडला आणि सचिन याने घटनास्थळावरून पलायन केले.

पोलीस आयुक्त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले उपनिरीक्षक लक्ष्मण घुमरे, सहाय्यक फौजदार नारायण बुट्टे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमीला रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत बाबासाहेब याचा मृत्यू झालेला होता .


शेअर करा