पहाटे घरात घुसून पोलीस निरीक्षकाची न्यायमूर्तींना दमदाटी ,काही मिनिटात कारवाई

शेअर करा

न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय हा सर्वांसाठी बंधनकारक असतो मात्र वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले अधिकारी अनेकदा त्यात फाटे फोडून न्यायालयाच्या निर्णयाचा देखील अवमान करतात. काही महाभाग त्याही पुढे जाऊन भलताच प्रकार करतात अन अशीच एक घटना गडचिरोली जिल्ह्यात समोर आलेली असून गुन्हा नोंदवण्याचा आदेश देणाऱ्या न्यायाधीशांना घरी जाऊन धमकावण्याची हिम्मत एका पोलीस निरीक्षकाने केलेली आहे त्यानंतर त्यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आलेले आहे. ज्या पोलीस ठाण्यात अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले त्याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, चार्मोशी बाजार समिती निवडणुकीच्या मैदानात अतुल गण्यारपवार यांचे पॅनल होते. 20 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. त्या दिवशी पहाटे गण्यारपवार यांना पोलीस ठाण्यात बोलावून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर होता. त्या मारहाणीत गण्यारपवार यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर देखील झालेले होते.

पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी तसेच त्यांच्या बडतर्फीसाठी चार्मोशी इथे आंदोलन देखील करण्यात आलेले होते त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन डी मेश्राम यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आणि पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर कलम 294 324 336 आणि 342 नुसार गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.

गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिल्यानंतर असा काही प्रकार होईल याची न्यायाधीश महोदयांना कल्पनाही नव्हती. 25 मे रोजी सकाळी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे हे न्यायाधीश यांच्या निवासस्थानी गेले आणि गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिल्यावरून त्यांच्याशी हुज्जत घातली तसेच त्यांना धमकावले. न्यायमूर्ती मेश्राम यांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याप्रकरणी माहिती दिली आणि पोलीस अधीक्षक यांनी अवघ्या काही मिनिटांच्या आत खांडवे यांचे निलंबन केलेले आहे . बीड जिल्ह्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या राजेश खांडवे हे २०१५ मध्ये राज्यसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलाच्या सेवेत रुजू झाले आणि पहिलीच पोस्टिंग गडचिरोलीसारख्या आव्हानात्मक जिल्ह्यात मिळाली होती .


शेअर करा