लग्न होऊनही आरोपीकडून त्रास देणे सुरूच , विवाहिता पोहचली पोलिसात

शेअर करा

नगर जिल्ह्यात महिलांची छेडछाड आणि महिला अत्याचाराचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून असेच एक प्रकरण शहरात समोर आलेले आहे . महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आरोपीने त्रास दिला. लग्न होऊन सासरी आल्यावर देखील पतीच्या फोनवर मेसेज करत तिला त्रास दिल्याचा प्रकार समोर आलेला असून विवाहित महिलेने अखेर तोफखाना पोलिसात दाखल होत शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, स्वप्निल महेंद्र कदम ( राहणार रांजणगाव सांडस तालुका शिरूर जिल्हा पुणे ) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात 23 वर्षीय महिलेने फिर्याद दिलेली आहे. महिला महाविद्यालयात शिक्षण घेत असताना देखील आरोपी आपला पाठलाग करायचा आणि आपल्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचा असे देखील त्यांनी म्हटलेले आहे. नगरमधील एका तरुणासोबत मे 2022 मध्ये अखेर या तरुणीचे लग्न झालेले होते.

लग्न झाल्यानंतर तरी आरोपी आपला पाठलाग करणे सोडून देईल आणि आपल्याला त्रास देणे सोडेल अशी विवाहित महिलेला आशा होती मात्र तरी देखील आरोपीने तिच्यासोबत वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न केला. महिलेने अखेर त्याचा फोन नंबर ब्लॉक करून टाकला त्यानंतर आरोपीने तिच्या पतीच्या मोबाईलवर मेसेज करण्यास सुरू केले. सातत्याने अशा पद्धतीने त्रास होत असल्याने अखेर महिलेने तोफखाना पोलिसात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.


शेअर करा