हिंदुस्थानात राहायचं असेल तर.., कॉन्स्टेबल चेतन सिंह मानसिकरीत्या स्थिर

शेअर करा

31 जुलै 2023 रोजी जयपुर मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये शिवीगाळ करत एका विशिष्ट धर्माच्या द्वेषातून चार जणांची हत्या केल्याचा प्रकार समोर आलेला होता. सदर प्रकरणी रेल्वे पोलीस दलाचा आरोपी कॉन्स्टेबल चेतन सिंह याची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचा दावा करण्यात आला मात्र रेल्वे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये आरोपी मानसिक दृष्ट्या पूर्णपणे स्थिर असून त्याने अजाणतेपणाने हे कृत्य केलेले नाही. आपण काय करत आहोत याची त्याला पूर्ण जाणीव होती असे न्यायालयात म्हटलेले आहे .

रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी 1000 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केलेले असून आरोप पत्रात सांगितले आहे की , ‘ 150 जणांचा जबाब घेतल्यानंतर आरोपी मानसिक दृष्ट्या स्थिर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बोरिवली मेट्रोपॉलिटन कोर्टात सीआरपीसी 164 अंतर्गत तीन साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे.

तपासकर्त्या पथकाने रेल्वेच्या डब्यात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजचा देखील तपास केला त्यामध्ये आरोपी चेतन सिंह हा डब्यामध्ये अक्षरश: फिरून विशिष्ट धर्माच्या नागरिकांचा शोध घेत होता असे म्हटलेले आहे. 31 जुलै 2023 रोजी हा धक्कादायक प्रकार घडलेला होता. आरोपी कॉन्स्टेबल याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झालेला होता त्यामध्ये तो ‘ हिंदुस्थानात राहायचं असेल तर मोदी योगी यांनाच निवडून द्या आणि तुमचे ठाकरे.. ‘ असे देखील म्हणत होता. रेल्वे पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही हत्या आरोपीने सांप्रदायिक द्वेषातून केल्याचे म्हटलेले असून आरोपीने केलेल्या चार हत्यांमध्ये टिकाराम नावाच्या व्यतिरिक्त इतर तीन जण हे अल्पसंख्यांक समुदायाचे होते असे देखील म्हटलेले आहे.


शेअर करा