आयुक्त साहेब..शालेय विद्यार्थी अन वृद्धांनी शहरात राहायचं का नाही ? 

शेअर करा

नगर शहरात सध्या भोंगेबाजांचा धुमाकूळ जोरजोरात सुरू असून त्यांच्यावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. शहरात तसेच उपनगरात आपल्या वस्तू आणि स्कीम यांची जाहिरात करण्यासाठी रिक्षावर भोंगे लावत जाहिरात केली जाते. विशेष म्हणजे या व्यक्तींकडे कुठलाही परवाना नसतो मात्र रिक्षावर भोंगा लावत शहरातील शांतता भंग करण्याचे काम बिनबोभाट सुरु आहे. 

नगर शहरात अनेक ठिकाणी कोचिंग क्लासेस आहेत आणि या कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षण घेण्यासाठी तालुका भरातून अनेक विद्यार्थी रूम घेऊन दिवसरात्र अभ्यास करतात . त्यांना देखील या भोंगाबाजांचा जोरदार मोठ्या प्रमाणात त्रास होतो मात्र सांगायचे कुठे आणि तक्रार कुणाकडे करायची ? याची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते तर दुसरीकडे शहरात अनेक ठिकाणी रुग्णालये असून रुग्णालयांमध्ये देखील या भोंगेबाजांचा मोठ्या प्रमाणात आजारी व्यक्तींना तसेच लहान बाळांनाही त्रास होतो. 

नगर शहरात गेल्या काही वर्षांपासून अशा जाहिरात बाजांचा जोरदार धुमाकूळ सुरू असून त्यात वेगवेगळे ज्वेलर्स , बिल्डर्स , खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्ती , सिमकार्ड विक्रेते अशा पद्धतीने व्यवसाय करताना दिसून येत आहेत.महापालिकेकडून कुठलीही परवानगी न घेता सर्रासपणे शहरातील शांतता भंग करण्याचे काम या भोंगाबाजांनी सुरू केलेले असून महापालिका आयुक्त तसेच प्रशासनाकडे अशा कारवायांसाठी कुठलाही वेळ नसल्याचे दिसून येत आहे. 

शहरातील प्रत्येक घरामध्ये शालेय शिक्षण घेणारी लहान मुले , वृद्ध व्यक्ती देखील असतात त्यांना देखील या भोंग्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो . सदर मुद्दा केवळ जाहिरात करणाऱ्या भोंगाबाज व्यक्तींपर्यंतच मर्यादित नाही तर धार्मिक मिरवणूक , लग्नसोहळे , वाढदिवसाचे इव्हेंट , फटाक्यांची आतषबाजी यामुळे शहरातील नागरिकांचा शहरात शांतपणे जगण्याचा हक्कच हिरावून घेतला जात आहे. 


शेअर करा